संचारबंदीत किराणा माल विकत घेण्यासाठी घाई केल्याने ठरवून दिलेल्या कोटय़ापेक्षा अधिकची साखर अनेक ग्राहकांनी आधीच उचलली. परिणामी पुढील दहा दिवस पुरेल एवढाच साखरेचा साठा असल्याने साखरेचा कोटा वाढवून देण्याचा निर्णय गुरुवारी घेण्यात आला आहे. व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी नगर जिल्ह्यतील साखर कारखानदारांशी चर्चा करून ७०० क्विंटल साखरेचा कोटा वाढवून घेण्यासंदर्भात चर्चा झाली असल्याचे सांगितले. दरम्यान कोणत्याही प्रकारची साठेबाजी होणार नाही, याची काळजी घेतली जाणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. मात्र, साखरेच्या नियतनाचा प्रश्न केवळ एका जिल्ह्यपुरता न राहता तो अनेक ठिकाणचा असल्याने काही जिल्ह्यंसाठी अपवाद म्हणून साखर कारखान्यांना अधिकचा कोटा मंजूर करावे अशी मागणी होत आहे.

औरंगाबाद शहरातील साखर तसेच इतर जीवनावश्यक साहित्याचा पुरवठा नीटपणे व्हावा म्हणून घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये किमती वाढणार नाहीत, याची काळजी घेतली जाईल, असे आश्वासन व्यापारी महासंघाने दिले आहे. मात्र, पूर्वी एका मालाची वाहतूक केल्यानंतर शहरात दुसरा माल आणला जात असे. मात्र, आता नगर जिल्ह्यतून साखर आणण्यासाठी दुहेरी वाहतूक करावी लागेल, त्यामुळे किरकोळ बाजारात त्याची किंमत काहीशी वाढू शकते, असे सांगण्यात येत आहे.

तरीही काळा बाजार होणार नाही आणि गरजपेक्षा कोणी अधिक माल खरेदी करत असेल तर त्यावरही रोख लावला जाईल, अशा प्रकारची चर्चा प्रशासनातील वरिष्ठांबरोबर करण्यात आली आहे.

या अनुषंगाने जिल्हाधिकारी उदय चौधरी म्हणाले की, साखर आणि अन्य जीवनावश्यक वस्तूंची कमतरता जाणवू नये म्हणून वाढीव कोटा मंजूर करण्याचे आदेश पुरवठा विभागाकडून काढले जात आहेत.

वाहतुकीमध्ये अडचणी येऊ म्हणून पोलिसांबरोबर चर्चा करण्यास सांगण्यात आले आहे. सध्या कोणत्याही वस्तूचा तुटवडा नाही. पुढील दहा दिवसात साखरेचाही  पुरेसा साठा असेल. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही, असे जिल्हाधिकारी म्हणाले.