22 February 2020

News Flash

जायकवाडीच्या पाण्याबाबत शनिवारी निर्णय होणार

जायकवाडी जलाशयात नगर व नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून किती पाणी सोडता येऊ शकते, याचा आढावा घेण्यासाठी शनिवारी (दि. १७) गोदावरी पाटबंधारे मंडळाच्या कार्यकारी संचालकांनी विशेष बठक

जायकवाडी जलाशयात नगर व नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून किती पाणी सोडता येऊ शकते, याचा आढावा घेण्यासाठी शनिवारी (दि. १७) गोदावरी पाटबंधारे मंडळाच्या कार्यकारी संचालकांनी विशेष बठक बोलावली आहे. नगर-नाशिकचे जिल्हाधिकारी व अधीक्षक अभियंता यांना या बठकीची निमंत्रणे दिली आहेत. उद्यापर्यंतचा (गुरुवार) वरच्या धरणातील पाणीसाठा हा निकष ठरवून पाणी वितरण होणार असल्याने मेंढेगिरी समितीने सुचविलेल्या पहिल्या धोरणानुसार पाणी सोडले जाणार आहे. मात्र, त्याचे प्रमाण किती हे शनिवारच्या बठकीतच ठरणार आहे.
महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने दिलेल्या निर्णयानुसार समन्यायी पाणी वाटपासाठी होणाऱ्या बठकीपूर्वी पाणीसाठय़ाचा अंदाज घेतला असता धरण ३७ टक्क्यांपेक्षा कमी असेल, तर कोणत्या धरणातून किती पाणी सोडावे, याचा आराखडा मेंढेगिरी समितीने ठरवून दिला होता. तोच आराखडा वापरून समन्यायी पाणी वाटप करावे, असे स्थायी आदेश जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने दिले आहेत. जायकवाडी जलाशयात सध्या केवळ ६ टक्के साठा आहे. पहिल्या धोरणानुसार १५ ऑक्टोबरला मुळा धरण समूहात ४९ टक्क्य़ांपेक्षा अधिक, प्रवरामध्ये ५६ टक्के, गंगापूरमध्ये ६१ टक्के, दारणामध्ये ६४ टक्के, पालखेडमध्ये ७३ टक्क्य़ांपेक्षा अधिक पाणी असेल तर अधिकचा हिस्सा जायकवाडीत सोडावा, असे निर्देश आहेत.
धरण समूहातील या पाणीसाठय़ात खरिपातील वापरही जोडला जाणार असल्याने जायकवाडीत पाणी येईल, अशी आशा असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, त्याचे प्रमाण अद्यापि ठरले नाही. नगर-नाशिक जिल्ह्यातील पिण्याच्या व औद्योगिक पाणी वापराचे आरक्षण लक्षात घेऊन उर्वरित अतिरिक्त पाणी सोडले जाणार आहे.
जायकवाडी धरणावर नाशिक जिल्ह्यात १३ मोठे व ७ मध्यम, तर नगर जिल्ह्यात ३ मोठे व ३ मध्यम प्रकल्प आहेत. ५ धरण समूहातील पाण्याची टक्केवारी मोजून हा निर्णय होणार आहे. जायकवाडीत ३७ टक्क्यांपेक्षा कमी पाणी असेल तर वरच्या धरणात किती पाणी असावे याचा तक्ताच विकसित करण्यात आला आहे. त्यानुसार मुळा धरणातील १०.५९ टीएमसीच पाणी ठेवता येईल. त्यापेक्षा अधिकचे पाणी जायकवाडीस द्यावे लागणार आहे. तसेच प्रवरा धरण समूहातील ४ धरणांमध्ये ११ टीएमसीपेक्षा अधिकचे पाणी म्हणजे ५६ टक्क्य़ांपेक्षा अधिकचे पाणी मिळण्याची शक्यता आहे. गंगापूर धरण समूहातून ६ टीएमसी, दारणातून १६ टीएमसी व पालखेडमधून ८.९६ टीएमसीपेक्षा अधिक पाणी ठेवता येणार नाही.
पाण्याची टक्केवारी आणि अस्तित्वात असणाऱ्या प्रकल्पातील पाणीसाठा याचा आढावा शनिवारी घेतला जाणार असून, त्याच दिवशी कोणत्या धरणातून किती पाणी सोडायचे, याचा निर्णय कार्यकारी संचालकांना घेणे बंधनकारक आहे. या पाश्र्वभूमीवर होणाऱ्या या बठकीस आवश्यक असणारी १५ ऑक्टोबरच्या धरणसाठय़ाची माहिती अधिकाऱ्यांनी घेतली असून समन्यायी पाणी वाटपाचा निर्णय शनिवारी घेतला जाणार आहे. नाशिक जिल्ह्यातील १३ मोठय़ा प्रकल्पात ४६.८९ टक्के साठा आहे. मध्यम प्रकल्पात ४८.९० टक्के, तर नगर जिल्ह्यातील तीन मोठय़ा प्रकल्पात ५७.५२ टक्के व मध्यम प्रकल्पात ६१.७६ टक्के साठा आहे. मात्र, निकष धरण समूहाचा असल्याने त्याचे नियोजन शनिवारीच होण्याची शक्यता आहे.

First Published on October 15, 2015 1:50 am

Web Title: decision to saturday of jayakwadi water
टॅग Decision,Jayakwadi
Next Stories
1 ‘आमच्यातले गुण-अवगुण कोणी ओळखलेच नाहीत’!
2 शिवसेना-भाजपमध्ये संवादाअभावी मतभेद – भय्यूमहाराज
3 भाजप-राष्ट्रवादीचा श्रेयासाठी कलगीतुरा!