औरंगाबाद : करोना संसर्गाच्या निर्बंधांमुळे एप्रिल महिन्यात साडेतीन लाख लिटर दूध दररोज अतिरिक्त ठरू लागले आहे. पिशवीबंद दूधविक्रीतही तीन लाख लिटरची घट झाली आहे. दूधभुकटीचे दर २५० रुपये किलो रुपयांहून २१० रुपयांपर्यंत घसरले आहेत. परिणामी दूध व्यवसाय अडचणीत आला असून राज्य सरकारने प्रतिदिन पाच लाख लिटरची खरेदी करावी, अशी मागणी दूध संघांकडून करण्यात आली आहे.

करोना संसर्ग वाढत असताना मार्चअखेरीपर्यंत राज्यात प्रतिदिन १२३.५१ लाख लिटर दुधाचे संकलन होत असे. एप्रिलमध्ये त्यात वाढ दिसून आली आहे. १२६.७८ लाख लिटर दूध आता संकलित होते. छोटे व्यावसायिक हॉटेल बंद असल्यामुळे आणि दही, लस्सी अशी विक्री कमी झाल्यानेही ते दूध सहकारी संस्थांमार्फत संकलित होऊ लागल्याने साडेतीन लाख लिटर दूध अतिरिक्त होऊ लागले आहे.

अतिरिक्त दुधापासून भुकटी करणारे १७ पेक्षा अधिक खासगी व सरकारी प्रकल्प आहेत. त्यांची भुकटी बनविण्याची क्षमता १०० लाख लिटर दुधाची असली तरी दूधभुकटीचे दर घसरले आहेत. फेब्रुवारी-मार्चमध्ये ते २५० रुपये एवढे होते, आता ते २१० ते २०० रुपयांपर्यंत घसरलेले आहेत. दररोजचा तीन ते चार लाख लिटरचा अतिरिक्त पुरवठा दूधभुकटी प्रकल्पाकडे वळविण्यासाठी जिल्हा दूध संघांना आणि दूध विकास क्षेत्रातील मंडळींना कसरत करावी लागत आहे. या सर्वांचा परिणाम शेतकऱ्यांकडून घेतल्या जाणाऱ्या दूध खरेदी दरावर झाला असून फेब्रुवारी-मार्चमध्ये २८ ते ३० रुपये असणारा गाईच्या दुधाचा दर आता २५ ते २६ रुपये इथपर्यंत खाली आला आहे. परिणामी अडचणी वाढल्या आहेत.

प्रश्न गुंतागुंतीचा

पिशवीबंद दुधातील मार्चमधील विक्री ७९ लाख लिटर एवढी होती. ती एप्रिलमध्ये ७३ लाख लिटरपर्यंत घसरलेली आहे. याशिवाय दूध संकलनात झालेली वाढ आणि दूधभुकटीचे दर यामुळे अतिरिक्त दुधाचा प्रश्न गुंतागुंतीचा बनू लागला आहे.

‘‘राज्यात करोना संसर्गाच्या निर्बंधांमुळे दूध संकलन वाढले आहे. परिणामी दूध अतिरिक्त ठरत आहे. हे दूध राज्य सरकारने विकत घ्यावे, अशी माझी मागणी आहे. तसा प्रस्तावही मंत्रिमंडळात चर्चेसाठी ठेवला जात आहे.’’ – संजय बनसोडे, राज्यमंत्री, महाराष्ट्र

‘‘गेल्या काही दिवसांपासून दूध विक्रीत घट दिसून येत आहे. दुग्ध विकास मंडळातील अधिकाऱ्यांबरोबर अलीकडेच झालेल्या बैठकीत प्रतिदिन पाच लाख लिटर दूध राज्य सरकारने खरेदी करावे, अशी मागणी नोंदविण्यात आली आहे. खासगी दूध संघांनी दुधाचे दर खाली आणले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.’’ – हरिभाऊ बागडे, आमदार फुलंब्री