ज्वारीचा पेरा ८१ टक्क्यांनी घसरला; सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ

मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली आहे. खरीप हंगामाच्या बैठकाही पार पडल्या आहेत. पण मराठवाडय़ातल्या पीक रचनेत या वर्षी तसा फारसा फरक असणार नाही. दुष्काळी मराठवाडय़ात पुन्हा एकदा ऊस लागवड जोरात आहे आणि ज्वारी, बाजरीचे क्षेत्र घटते आहे. गेल्या २० वर्षांत एकूण क्षेत्राच्या तीन टक्के क्षेत्रावर ज्वारी आणि तेवढय़ाच क्षेत्रावर बाजरी शिल्लक राहिली आहे. दुसरीकडे सोयाबीनच्या क्षेत्रात झालेली वाढ तब्बल पाच हजार ४६५ टक्के एवढी आहे. ज्वारीचे क्षेत्र ८१ टक्क्य़ांनी घसरले, तर बाजरीचे क्षेत्र ६८ टक्क्य़ांनी.  वाढले काय तर नगदी पिके. अन्नधान्याऐवजी मराठवाडय़ात कापूस आणि सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होईल, असा कृषी विभागाचा अंदाज असला तरी कापसावर पडलेल्या बोंडअळीमुळे हे क्षेत्र या वर्षी घटेल, असा अंदाज आहे.

दर चार वर्षांनी मराठवाडय़ात दुष्काळ पाचवीला पुजल्यासारखा ठरलेला असतो. तरीही ऊसपीक लागवडीत मराठवाडय़ातले शेतकरी अग्रेसर आहेत. गेल्या काही दिवसांत आत्महत्यांचा आकडा वाढत असला तरी अन्नधान्याऐवजी नगदी पिके घेण्याकडेच कल वाढलेला आहे. १९९७ ते २०१७ या कालावधीत मराठवाडय़ातील पिकांच्या रचनेचा अभ्यास नुकताच खरीप हंगाम बैठकीत सादर करण्यात आला. सोयाबीनचे क्षेत्र एक टक्क्य़ावरून ३७ टक्क्य़ांपर्यंत वाढत गेले. सरासरी ३० लाख ९० हजार हेक्टरावर खरिपाची पेरणी होते. त्यात कापूस ३४ टक्के असतो. सोयाबीनचे प्रमाण मात्र वाढत गेले आहे. तुलनेने तूर, मूग, उडीद या कडधान्यांमध्ये काहीशी वाढ दिसून येते. १९९७च्या तुलनेत गेल्या २० वर्षांत तूर, मूग, उडदाच्या क्षेत्रात दोन टक्क्य़ांची वाढ झाली आणि अन्नधान्याची पिके ४० टक्क्य़ांहून ६ टक्क्य़ांपर्यंत घसरली.

गेल्या वर्षी पीकवाढीच्या अवस्थेत ३७ दिवसांचा पावसाचा खंड होता. त्यामुळे उत्पादनात घट झाली. या वर्षी शेतकऱ्यांना कापसाच्या पेऱ्याबाबत माहिती दिली जात असून बोंडअळी येऊ नये म्हणून पूर्वहंगामी लागवड करू नये, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. पीक रचनांमध्ये झालेले बदल नव्याने दुरुस्त करायचे असल्यास हमीभावाचे गणित नव्याने मांडण्याची आवश्यकता असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात. त्यामुळेच १ जूनपासून होणाऱ्या आंदोलनाला मराठवाडय़ातून या वेळी अधिक प्रतिसाद मिळेल, असेही सांगितले जात आहे.

  • मराठवाडय़ात विशेषत: दुष्काळी पट्टय़ात ज्वारीचे मोठे पीक होते. ज्वारीचा २६ टक्के आणि बाजरी १४ टक्के पेरा २० वर्षांपूर्वी होता.
  • २०१७ मध्ये पेरणीचे सरासरी क्षेत्र वाढले. ते ३०.९० लाख हेक्टरांहून ४९.११ लाख हेक्टर एवढे झाले. मात्र, ज्वारीचा टक्का २६ टक्क्य़ांहून तीन टक्क्य़ांवर आला.
  • पूर्वी ७.९९ लाख हेक्टरावर ज्वारी लावली जात असे. आता हे प्रमाण १.५५ हेक्टपर्यंत घसरले आहे. उस्मानाबाद जिल्ह्य़ातील कळंब, परंडा तसेच बीड जिल्ह्य़ातील ज्वारी आणि बाजरी प्रसिद्ध होती.
  • ऊसतोडणीला जाणारे कामगार बहुतांशवेळी एक पीक घ्यायचे आणि ते बाजरीचे असे. १९९७-९८ मध्ये बाजरीची लागवड १४ टक्के एवढी होती. ती आता तीन टक्क्य़ांपर्यंत खाली घसरली आहे. मागील दहा वर्षांत या पीक रचनेत मोठे बदल दिसून आले. नगदी पिकाकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढला आहे.
  • औरंगाबाद जिल्ह्य़ात मका हे पीक घेतले जाते. त्यात काहीशी वाढ आहे. पण आश्चर्यकारकपणे भुईमुगाचा पेरा घटलेला आहे.
  • गेल्या २० वर्षांत ही घट तब्बल ६८ टक्क्य़ांची असल्याची माहिती राज्य सरकारकडे उपलब्ध आहे. एका बाजूला ऊस वाढतो आहे आणि दुसरीकडे अन्नधान्याची पिके कमी होत आहेत.
  • बहुतांश शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या कारणामध्ये या पीक रचनेचा मोठा वाटा असल्याचे सांगण्यात येते.