औरंगाबाद : प्राणवायूचा अनियमित होणारा पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासनाची होणारी कसरत एका बाजूला सुरू असताना अंगावर दुखणे काढण्याच्या प्रमाणामुळे गंभीर अवस्थेमध्ये रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे दाखल झाल्यानंतर २४ तासांत मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. व्हेटिंलेटरवरच्या आधारे होणाऱ्या उपचारानंतर बरे होण्याचे प्रमाणही कमी आहे. त्यामुळे लक्षणे दिसल्यानंतर तातडीने चाचणी करून उपचार करण्याबरोबरच वैद्यकीय अधिकारी कमी असणाऱ्या जिल्ह्यात लसीकरणावर भर दिला जात आहे. जेवढी लस येते ती पूर्णत: वापरली जात असून यामध्ये उस्मानाबाद अग्रेसर असल्याचे दिसून येत आहे.  मराठवाडय़ात मिळणाऱ्या लशीपैकी ते देण्याचे प्रमाण ८७ टक्के एवढे असल्याचे दिसून येत आहे. लस उपलब्धतेतील सारे अडथळे दूर झाले तर आणि तरच मृत्युदर काही अंशी कमी होईल, असे मानले जात आहे.

औरंगाबाद शहरात गेल्या सात दिवसांपासून सरासरी २७ ते ३० मृत्यू होत आहेत. पण स्थिती गंभीर झाल्याशिवाय रुग्णालयात न जाण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे २४ ते ४८ तासांत मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. उस्मानाबादसारख्या छोटय़ा जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ३३ मृत्यू झाले. त्यामुळे येत्या काळात छोटय़ा जिल्ह्यात जिथे डॉक्टरांची आणि वैद्यकीय सुविधांची कमतरता आहे, तेथे लस पुरवठा अधिक करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. संसर्ग अधिक असणारे जिल्हे, वैद्यकीय सुविधा आणि डॉक्टरांची संख्या कमी असणारे जिल्हे अशी वर्गवारी करून लस वितरणाचा प्राधान्यक्रम बदलण्यात यावा, असे सांगण्यात येत आहे. लस उपलब्धेतच्या प्रमाणात लसीकरणाचे प्रमाण औरंगाबाद जिल्ह्यात ८६.७२ आहे. हिंगोली जिल्ह्यात पहिल्या लाटेत चांगले काम झाले. आता लसीकरणाचे प्रमाण ८८.७० एवढे आहे. तर परभणीमध्ये ९८.११ तर उस्मानाबादमध्ये वितरित सर्व लसी वापरण्यात आल्या आहेत. १०० टक्के लसीकरण केल्यानंतरही गंभीर रुग्णांची स्थिती वाढत असल्याने वैद्यकीय यंत्रणेवर मोठा ताण असल्याचे जिल्हाधिकारी कौतुभ दिवेगावकर यांनी सांगितले. मिळणारी लस आणि होणारे लसीकरण यामध्ये सर्वात कमी प्रमाण जालना जिल्ह्याचे असले तरी ते देखील ७९ टक्के एवढे आहे. पण लस पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याने प्रशासनानेही हात टेकले आहेत. छोटय़ा आणि सुविधा कमी असणाऱ्या जिल्ह्यात लसीकरणावर भर देण्याची मागणी होत आहे.