दहा दिवस मनोभावे पूजन केल्यानंतर विसर्जित केलेल्या गणेश मूर्तीच्या अवशेषाचे दशावतार जलाशयात विखुरलेले पाहून मनाला झालेल्या वेदनेतून औरंगाबादच्या मूळचा अभियंता असलेल्या एका ज्येष्ठ कलाकाराला दीर्घकाल टिकणाऱ्या आणि स्वच्छही करता येईल, अशा गणेश मूर्ती निर्माण करण्याची प्रेरणा मिळाली. त्यातून फायबरच्या असंख्य कलाकृतींची निर्मिती घडत गेली. यासाठी अंगभूत असलेले अभियांत्रिकीचे ज्ञानही कामी आले.

औरंगाबादमधील किशोर विष्णुपंत सातपुते हे ते साठी ओलांडलेले ज्येष्ठ कलाकार आहेत. जुन्या काळातील बी. ई. मॅकॅनिकलमध्ये त्यांचे शिक्षण झालेले. मात्र, फायबरचे गणपती, विविध कलाकृती करण्यात त्यांना आनंद वाटू लागला आणि तोच त्यांनी मुख्य व्यवसाय म्हणून स्वीकारला. आज त्यांच्या मूर्ती, कलाकृतींना दिल्ली, कर्नाटक, पुणे, नागपूर, बीड आदी ठिकाणांहून मागणी असते. औरंगाबादमधील पोलीस आयुक्त कार्यालयात भरलेल्या १२ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेदरम्यान, मुख्य कमानीवर वेरूळ येथील १६ नंबर लेणीवरील गंधर्वाच्या ४ फुटी मूर्ती, पितळखोरा येथे सापडलेल्या यक्षाची २ फुटी मूर्ती त्यांनीच साकारली होती. दिल्ली येथे १९९७ च्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दर्शनासह अष्टविनायक, कैलासस्तंभ, ४ फुटी पद्मपाणी, विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराजवळची सहा फुटी प्रतिकृती, लेणींचा स्तंभ, दीपमाळ आदीसह गौतमबुद्ध, हुबेहूब साप, कुत्रे, घुबड, नंदी, बैल, दीप-लक्ष्मी, अशा कलाकृती ते साकारतात. लाकडावरही ते कोरीव गणेश मूर्ती साकारतात.

मध्यंतरी हेल्मेटसक्तीचा नियम आल्यानंतर स्वत:साठी एक कॅमेराही बसवता येईल आणि माणसासारखे कान असलेले  फायबरपासूनचे हेल्मेटही तयार केल्याचे किशोर सातपुते यांनी सांगितले.