जेवणावळी, मंगल कार्यालयाच्या वाचलेल्या खर्चापोटी वरदक्षिणेत वाढ

सुहास सरदेशमुख, लोकसत्ता

औरंगाबाद : करोनाकाळात विवाह सोहळ्यातील महागडय़ा ‘डीजे’ संस्कृतीला छेद बसला तरी त्याची भरपाई म्हणून हुंडय़ामध्ये रोख रकमेऐवजी सोने देण्याचा प्रकार मराठवाडय़ात वाढू लागला आहे. त्यामुळे लग्नकार्यातील सर्वाधिक महत्त्वाची खरेदी ही सोन्याची होत असून सुवर्णकार कमालीचे व्यग्र बनले आहेत.

टाळेबंदीमध्ये लग्नसराई असल्याने विवाहात गर्दी करण्यावर बंधने आली होती. त्यामुळे वधुपित्याचे अनेक खर्च वाचले असे सकृद्दर्शनी दिसत असले तरी त्याची भरपाई सोने खरेदीतून त्यांना करून द्यावी लागल्याची उदाहरणे आता मराठवाडय़ात चर्चेत येत आहेत.

ग्रामीण भागात वधूच्या गावी जाण्यासाठी चार दुचाकी गाडय़ा पुरेशा होत. चहा- पोहे करून विवाह सोहळेही संपन्न झाले. जालना जिल्ह्य़ातील भोकरदन, परतूर या भागात या लग्नाला ‘चहा-पोहे’ लग्नही म्हणण्याची पद्धत सुरू झाली. करोनामुळे अनेकांचे नुकसान झाले. टाळेबंदीमुळे अनेकांसमोर जगण्याची भ्रांत निर्माण झाली. पण याच काळात विवाह सोहळ्यातील बडेजावपणा कमी झाल्याचे दिसत होते. मराठवाडय़ात लग्नात वाचलेला हा खर्च हुंडय़ाऐवजी सोने घेण्यावर खर्च करण्याची नवी प्रथा विकसित झाली असल्याचे दिसून देत आहे. या अनुषंगाने बोलताना महाराष्ट्र सुवर्णकार फेडरेशनचे सहसचिव मंगेश लोळगे म्हणाले, ‘जेव्हा सोन्याचा भाव ५७-५८ हजार रुपयांच्या घरात होता तेव्हा गुंतवणूक म्हणून अनेकांनी सोने घेऊन ठेवले. काही दिवस अगदी दुकानात गर्दी होती. आता पक्ष-पंधरवडय़ामुळे गर्दी कमी झाली असली तरी हे भाव वाढणार असल्याने दिवाळी आणि दसरा या सणांमध्ये पुन्हा सोने खरेदी वाढेल. मधल्या काळात विवाह मुहूर्तावरही सोने खरेदी होत होती. त्याचे प्रमाण दरवर्षीपेक्षा अधिक होते.’

सुवर्णकारांचा अंदाज..

मंगल कार्यालय, वाजंत्री- घोडा याशिवाय जेवणावळीचा कमी झालेला खर्च म्हणून वधूकडच्या मंडळींनी सोनेच द्यावे असा आग्रह होता. टाळेबंदीमध्ये तो पूर्ण झाला नाही. मात्र, ‘पक्ष -पंधरवडा’ लागेपर्यंत सोन्याच्या दुकानात गर्दी होती. दिवाळीतही ती वाढेल, कारण सोन्याचे भाव अधिक वधारतील, असा सुवर्णकारांचा अंदाज आहे.

हे होते कसे?:  किमान १५ तोळ्यांपासून विवाह बैठकांची बोलणी सुरू होते. विशेषत: धरणांच्या बाजूस जमीन असणाऱ्यांच्या सुपारी फोडण्याच्या बैठकांमध्ये या वर्षी रोकड हुंडय़ाऐवजी सोने खरेदीवरच अधिक जोर असल्याचे निरीक्षण आहे. मराठवाडय़ात बालविवाहाचे प्रमाणही काहीसे वाढले असल्याचे निरीक्षण या क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते सांगतात.