News Flash

पैठण संतपीठाच्या रचनेतील बदलामुळे नाराजी

मूळ आराखडय़ाच्या अंमलबजावणीची मागणी औरंगाबाद : संतपीठ या शब्दाचे पुरेसे आकलन न करता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील तो एक केवळ विभाग राहावा अशा पद्धतीने

पैठण संतपीठाच्या रचनेतील बदलामुळे नाराजी

मूळ आराखडय़ाच्या अंमलबजावणीची मागणी

औरंगाबाद : संतपीठ या शब्दाचे पुरेसे आकलन न करता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील तो एक केवळ विभाग राहावा अशा पद्धतीने केल्या जाणाऱ्या आखणीला आता विरोध दर्शविला जात असून केवळ वारकरी संप्रदायापुरतेच त्याचे स्वरूप ठेवले जाऊ नये, अशी विनंती सांस्कृतिक विभागास करण्यात आली आहे.

विविध धर्मातील संत परंपरा आणि त्याचा तौलनिक अभ्यास यासह प्रबोधनाच्या परंपरांचा अभ्यास या पीठातून आवश्यक असून त्याचे स्वतंत्र पीठ म्हणून मान्यता मिळणे गरजेचे होते. पण आता संतपीठाची व्याप्ती कमी करून त्याच्या उभारणीसाठी प्रयत्न केले जात आहेत, त्यास औरंगाबादमधील जाणकार विरोध दर्शवीत आहेत.

राज्य सरकारने १९८० च्या दशकात पैठण येथे संतपीठ करण्याची घोषणा केली होती. हे पीठ सांस्कृतिक केंद्र म्हणून विकसित व्हावे यासाठी गांधीवादी विचारवंत बाळासाहेब भारदे यांच्या अध्यक्षतेखाली आराखडा तयार करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती. संतसाहित्य अभ्यासक यू. एम. पठाण, प्राचार्य राम शेवाळकर हे या आराखडा समितीचे सदस्य होते. त्यांनी पैठण, मुंबई आणि औरंगाबाद येथे बैठका घेऊन संतपीठाचा आराखडा तयार केला होता. त्यानुसार हे स्वतंत्र आणि स्वायत्त पीठ म्हणून त्याचा विचार होणे गरजेचे असताना केवळ सरकारी खानापूर्तीसारखे याचे नियोजन सुरू असल्याचा आरोप संतपीठ पाठपुरावा समितीचे सदस्य ज्ञानप्रकाश मोदाणी यांनी केला आहे.

संत वाङ्मयाच्या समग्र अभ्यास, जगातील सर्व धर्माचा तौलनिक अभ्यास, महाराष्ट्रातील कीर्तन, प्रवचन याची मोठी परंपरा असून ही लोकपरंपरा निर्माण होण्याचा काळ, त्याची जडणघडण, समकालीन अन्य धर्मातील संत याचाही अभ्यास होणे महत्त्वाचे आहे. गोदावरी तीरी म्हणजे पैठण नगरीत होणारे हे संतपीठ मोठे सांस्कृतिक केंद्र म्हणून विकसित होऊ शकते. याच भागातून पैठणी तयार होते तसेच धरणामुळे विविध वनस्पती आणि पशुपक्ष्यांचा विहारही येथे असतो.

त्यामुळे या पीठाला पूर्ण स्वायत्तता मिळावी, अशी त्याची रचना करण्याची आवश्यकता असल्याचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही पाठविण्यात आले आहे. नव्याने मुख्यमंत्री होणाऱ्या बहुतेकांकडे संतपीठासाठी पाठपुरावा करणारे सदस्य आता आराखडय़ात बदल करुन केल्या जाणाऱ्या त्याच्या अंमलबजावणीवर नाराज आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्याापीठाचा एक भाग म्हणून संतपीठाची होणारी रचना मूळ उद्देशाच्या विपरित असल्याची टीका आता केली जाऊ लागली आहे.

२२ कोटी रुपयांचा निधी मंजूर

संतपीठासाठी राज्य सरकारने २२ कोटी रुपयांचा निधी मंजूर  करण्यात आला असून गेल्या ४० वर्षांपासून प्रलंबित असणारा प्रश्न सोडविला असल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला आहे. या संतपीठाला संत एकनाथाचे नाव देण्यात आले असून येथे तबला, पखवाज, गायन आदी अभ्याक्रमही सुरू होतील असे सांगण्यात येत आहे. संतपीठाचा अभ्यासक्रम तयार करण्याचीही प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे.

संतपीठाचा प्रवास

  • १९७५ साली मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी संतपीठाची घोषणा केली.
  •  २३ मार्च १९८० साली १२ सदस्यांची एक समिती बाळासाहेब भारदे यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आली.
  •  १९९१-९२ साली अर्थसंकल्पात एक कोटी रुपयांचा निधी
  •  संतपीठाचे हस्तातंरण विद्याापीठ प्रशासनाकडे केले
  •  २०११ मध्ये अभ्यासक्रम सुरू करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले
  •  तत्कालीन सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे आणि औरंगाबादचे माजी उपमहापौर संजय जोशी यांच्यासह झालेल्या बैठकीत पुन्हा एक समिती स्थापन करण्यात आली. पुन्हा एकदा अभ्यासक्रम तयारीची चर्चा सुरू  झाली

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरूडॉ. प्रमोद येवले यांनी या अनुषंगाने पैठण येथे बैठक घेतली

मूळ आराखडय़ाप्रमाणे संतपीठाची स्वायत्त निर्मिती करणे आवश्यक आहे. बाळासाहेब भारदे यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीने दिलेला मूळ आराखडा हा सर्व बाजूने विचार करून तयार केला गेला होता. पण आता त्यात खूप बदल केले जात असल्याने अभ्यासाची खूप व्याप्ती असणारा हा विषय खुजा तर केला जाणार नाही ना, अशी शंका आहे. त्यामुळे संतपीठ स्वायत्त असायला हवे यासाठी आग्रही आहोत. – ज्ञानप्रकाश मोदाणी, संतपीठ पाठपुरावा समिती

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2021 12:02 am

Web Title: demand for implementation of the original plan akp 94
Next Stories
1 पदवीधरांसाठी पहिल्या सत्रात भारतीय संविधान अनिवार्य विषय
2 बँकांचे एकत्रीकरण हा वित्तीय दोष दुरुस्तीचा मार्ग
3 मराठी सारस्वताचा मानबिंदू असणारी ज्ञानेश्वरी आता हिंदीत
Just Now!
X