बिपीन देशपांडे

पूजाताईंची शाळा अर्धवेळ झाली. पतीच्या हातचे काम गेले. घर चालवायला म्हणून अडगळीतील शिलाई मशीन काढून त्यावर पूजाताईंनी मुखपट्टय़ा तयार करण्याचे काम हाती घेतले. दिवसाला पन्नास ते शंभपर्यंत मुखपट्टय़ांची निर्मिती सुरू झाली. पूजाताईंचे पाहून त्यांच्याच ओळखीच्या अर्चनाताईंनीही अलीकडेच एक शिलाई मशीन विकतच घेतली. मुखपट्टय़ा शिवण्यासाठी. अर्चनाताईंसारख्या अडल्या-नडल्यांना शिलाई मशीन घेऊन देणाऱ्या काही संस्थाही मदतीसाठी सरसावल्या. यातून टाळेबंदीनंतर अनेक उद्योगांचे व्यवहाराचे चाक फारसे गतिमान झालेले नसले तरी त्यांच्या तुलनेत शिलाई यंत्राच्या बाजारपेठेत मात्र काहीसा उत्साह दिसत असून इतर उद्योगांच्या तुलनेत १५ ते २० टक्के यंत्रांना मागणी असल्याचे स्थानिक व्यावसायिक सांगत आहेत.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय म्हणून तोंडाला मुखपट्टी लावणे, यालाच पसंती मिळत आहे. मुखपट्टी न लावणे हा दंडात्मक गुन्हाही ठरविण्यात आल्याने जवळपास प्रत्येकाच्या तोंडाला मुखपट्टय़ा दिसू लागल्या. आजही बाजारपेठेत एन-९५ मास्कची किंमत ५० रुपयांवरच आणि त्याचे आयुष्यही चार-दोन दिवसांचेच असल्याने सर्वसामान्य माणूस घरगुती मुखपट्टय़ांनाच अधिक प्राधान्य देताना दिसतो आहे.

बाजारपेठेतही मुखपट्टय़ांची विक्री करणारे पावलोपावली दिसतात. साधारण दहा ते २० रुपयांना घरगुती सुती कापडाच्या मुखपट्टय़ा बाजारपेठेत मिळतात. या मुखपट्टय़ांची निर्मिती करणारा एक वर्ग चांगलाच कामाला लागलेला असून टाळेबंदीत नोकरी गेलेल्या महिला वर्गालाही मुखपट्टय़ा निर्मिती करून विक्री करण्याचा पर्याय सापडलेला आहे. मुखपट्टी निर्मितीसाठी शिलाई यंत्र आवश्यक आहे. बाजारपेठेत व्यावसायिक व घरगुती कामासाठी म्हणून वापरता येणारे शिलाई यंत्र सहा हजारांपासून ते ४०-५० हजारांपर्यंतचे उपलब्ध आहेत.

औरंगाबाद येथील शिलाई मशीनचे व्यावसायिक मुर्तजा आणि बिलाल यांनी सांगितले की, इतर उद्योगांच्या तुलनेत शिलाई मशीन विक्रेत्यांची स्थिती काहीशी बरी म्हणायला हवी. इतर उद्योगांच्या तुलनेत १५ ते २० टक्क्यांनी व्यवसाय वाढलेला आहे. संख्येत किती यंत्र विक्री झालेले आहेत, हे सांगता येणार नसले तरी मुखपट्टय़ांसारख्या नवनिर्मिती शिवण प्रकारासाठी खरेदी होत आहे. बाजारपेठेतील इतर व्यवसायांमध्ये अजूनही फारसे आशादायी चित्र नसले तरी शिलाई यंत्राच्या बाजारपेठेत दिलासादायक स्थिती आहे. औरंगाबादच्या क्रांती चौकाजवळील शिल्लेखाना ते पैठणगेट या भागातच सात ते आठ मोठी दुकाने आहेत. इतरही अनेक भागांत शिलाई यंत्राची बाजारपेठ आहे.

सोनापूर, आखतवाडा येथील मिळून आमच्या एकूण बचतगट समूहाकडे २२ शिलाई यंत्रे आहेत. त्यावर मुखपट्टय़ांसह इतरही शिवणकामे महिला करतात. शिलाई यंत्राची खरेदी ग्रामीण भागातील गरजू महिलांना फार अडचणीची ठरत नाही. पैसे फेडण्यासाठीही फार मोठी रक्कम एखाद्या महिलेला वाटत नाही. मुखपट्टय़ा तयार करण्यासाठी विचारणा कायमच होत असते.

– मीरा शेख, मासूम बचतगट, सोनापूर