लातूर शहरात डेंग्यूचा उद्रेक वाढला असून मंगळवारी औसा रस्त्यावरील दुसरा बळी गेला. या पाश्र्वभूमीवर नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहरातील रुग्णालयांत तापाने फणफणलेल्या रुग्णांचे प्रमाण खूपच वाढले आहे. बालरोग रुग्णालयात रुग्णांची भरती थांबवण्याची वेळ आली आहे. डेंग्यूच्या वाढत्या उद्रेकाबद्दल नागरिक महापालिका प्रशासनाला दोष देत आहेत, तर महापालिका नागरिकांच्या उदासीनतेला दोष देत आहे. महापालिकेच्या वतीने शहरात आतापर्यंत चार वेळा धूरफवारणी व अॅबेटिंग केली. घरोघरी यासंबंधी जागृतीही केली जात आहे. एडिस इजिप्ती या डासाची उत्पत्ती चांगल्या पाण्यात होते व ते पाणी उघडे ठेवले असेल तरच सात दिवसांत डास तयार होतात. पाणी झाकून ठेवावे. ते उघडे ठेवू नये असे वारंवार सांगूनही नागरिक आपली जबाबदारी पार पाडत नाहीत.
गावभागात डेंग्यूचा उद्रेक फारसा नाही. मात्र, सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या औसा रस्त्यावरच हे प्रमाण प्रचंड आहे. आतापर्यंतचे दोन्ही बळीही औसा रस्त्यावरील भागातीलच आहेत. मुक्या प्राण्यांना पाणी पाजले पाहिजे, हे लक्षात घेऊन अनेक नागरिकांनी आपल्या घरासमोर सिमेंटच्या छोटय़ा टाक्या जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी ठेवल्या आहेत. त्यात पाणी भरले जाते. मात्र, ते उघडे असल्यामुळे त्यात डासांची उत्पत्ती होते. आठ दिवसांतून एकदा ते स्वच्छ करून नंतर पाणी भरावे या बाबतची जागरूकता नागरिक दाखवत नाहीत. मुक्या जनावरांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून द्यायचे असेल तर बादलीत पाणी ठेवता येऊ शकते. महापालिकेच्या वतीने बुधवारी विविध भागात पाहणी करून असे उघडे पाण्याचे साठे नष्ट केले जातील व संबंधित घरमालकावर गुन्हे नोंदले जाणार असल्याचे महापालिका आयुक्त सुधाकर तेलंग यांनी सांगितले.
मागील तीन महिन्यांत जिल्हय़ात आतापर्यंत २४०जणांचे रक्तनमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्यातील ४६जणांचा अहवाल प्राप्त झाला. २८जणांना डेंग्यूची लागण झाली. रक्तातील प्लेटलेट कमी होण्याचे प्रमाण अनेक रुग्णांमध्ये आढळून येत आहे. लहान मुले व वृद्धांमध्ये आजाराचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. महापालिका जागरूक नाही. कचरा उचलला जात नाही. त्यामुळे प्रभागात दरुगधी पसरते व डासाची उत्पत्ती होते. आपली जबाबदारी महापालिका नीट पार पाडत नाही व दोष मात्र जनतेला देते असे नागरिकांचे म्हणणे आहे.