तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथे सव्र्हे क्र. २९ मधील गरिबांची घरे अतिक्रमण ठरवून नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी पाडली. येथील भूखंड नियमानुकूल करावेत व ५० जणांचे आहे त्याच ठिकाणी पुनर्वसन करावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा यांनी दिला. या प्रश्नासाठी बुधवारी त्यांनी विभागीय आयुक्तांची दुसऱ्यांदा भेट घेतली. या प्रश्नी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी उद्या (गुरुवारी) बठक घेणार असल्याचे सांगण्यात आले.
गरिबांना घरे देण्याचे धोरण सरकार ठरवत असतानाच नळदुर्ग नगरपालिकेने मात्र काही घरे अतिक्रमणे ठरवून पाडली. सव्र्हे क्र. २९ मध्ये केलेल्या या बेकायदा कारवाईतील ५० जणांना प्रत्येकी एक लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, तसेच आहे त्याच जागी पुनर्वसन करावे अशी मागणीही करण्यात आली. वारंवार निवेदन देऊनही गरिबांच्या प्रश्नाकडे कानाडोळा केला. कारवाई चुकीचे असल्याचे सांगत सुराणा यांनी यापूर्वी विभागीय आयुक्तांची भेट घेतली होती. काहीजणांचा या जागेवर डोळा असल्याने जाणीवपूर्वक ही कारवाई होत असल्याचे सांगण्यात येते. या जागेवर २००५ मध्ये भाजीबाजार व व्यापारी संकुलासाठी आरक्षण टाकण्यात आले होते. वास्तविक, ही जागा या दोन्ही कामांसाठी गरसोयीची आहे.
यापूर्वी नळदुर्ग येथे बांधण्यात आलेले दुकान गाळे व भाजीविक्रीचे कट्टे अजूनही वापरात नाहीत. मात्र, नव्या जागेत ते करण्याचा अट्टहास का हे समजत नाही, असा सवाल करीत सुराणा यांनी हा प्रश्न मार्गी न लागल्यास आंदोलन करावे लागेल, असा इशारा दिला.