12 August 2020

News Flash

आम्ही धावतच राहणार..!

करोनाकाळातही बाभूळगावच्या मुलींचा निर्धार, क्रीडा प्रशिक्षकामुळे प्रोत्साहन

संग्रहित छायाचित्र

सुहास सरदेशमुख

करोनामुळे जग थांबलं. वेगाची गती कमी झाली. मात्र, औरंगाबाद जिल्ह्य़ातील बाभूळगावाचे धावणे काही थांबले नाही. अगदी टाळेबंदीमध्येही मुलींनी धावणे सुरूच ठेवले पाहिजे असे येथील क्रीडा शिक्षकांनी सांगितले आणि मुंबई मॅरेथॉन गाजविणाऱ्या वैजापूर तालुक्यातील गायत्री गायकवाडच्या गावात आजही मुली दररोज सराव करतात. व्यायाम आणि धावणे या दोन्हीची गरज करोनामुळे अधोरेखित झाली असल्याने सात हजार लोकसंख्येच्या गावात आजही १०-१२ जणी सराव करतात. अर्थात त्याला मर्यादा आहेत. पण मुली अंतरनियम पाळून सराव करत असल्याचे त्यांचे प्रशिक्षक सतीश पाटील यांनी सांगितले.

वैजापूर तालुक्यातील जयहिंद विद्यालयात क्रीडा शिक्षक म्हणून काम करणाऱ्या सतीश पाटील यांनी धावपटू घडविण्याचा जणू विडाच उचलला आहे. कापूस वेचणीवर जाणाऱ्या, आई-वडिलांबरोबर शेती करणारी मुले क्रीडाक्षेत्रात आले पाहिजेत म्हणून प्रयत्न सुरू झाले. दररोज व्यायाम आणि धावण्याचा व्यायाम करणाऱ्या पाटील यांनी मुलांना मॅरेथॉनसाठी तयार करण्यास सुरुवात केली.

गायश्री गायकवाड या मुलीने मुंबई येथील टाटा इंटरनॅशनल मॅरेथॉन स्पर्धा ४१.५१ मिनिटाचा वेळ घेत जिंकली. तिने मिळविलेले हे यश पाहून गावातील इतर पालकही मुलींना शाळेत धावण्याच्या शर्यतीत भाग घेण्यास प्रोत्साहन देऊ लागले. कापूस वेचणीसाठी आणि शेतीतील कामावर जाणाऱ्या मुलींनी धावणे सुरूच ठेवले. अगदी टाळेबंदीमध्येही मुलींनी सराव कायम ठेवला. पण ग्रामीण भागात आता करोना संसर्ग वाढत असल्याने पालक घाबरू लागले आहेत. पण प्रतिकारशक्ती वाढत राहते म्हणून धावणे काही तसे बंद झाले नाही. गावातील बहुतांश मुलींना जयहिंद शाळेतील क्रीडा शिक्षकांनी प्रोत्साहित केले आहे. अगदी टाळेबंदीमध्ये छायाचित्रणे पाठवत तसेच व्यायाम कसा करावा याचे मार्गदर्शन सतीश पाटील करीत होते. त्यामुळे या गावातील मुलींचे धावणे तसे थांबले नाही.

गावातून दर वर्षी क्रीडा प्रकारातील विशेष प्रावीण्यामुळे सरासरी दोघांना नोकरी लागत आहे. विशेषत: पोलीस दलातील भरतीसाठी याचा चांगला लाभ होत असल्याचे दिसून आल्यानंतर पालकांनीही मुलीना धावायला प्रोत्साहन देण्यास केलेली सुरुवात कायम आहे. पण अडथळा शर्यतीसाठीचा सराव तसा थांबलाच आहे. शहरातही तो घेतला जात नाही. करोनामुळे क्रीडापटूंना त्यांचा दमसास टिकवून ठेवणे तसेच अधिक काळ सराव करण्याच्या सवयी बदलाव्या लागत असतानाच वैजापूर तालुक्यातील बाभूळगावतील मुली मात्र अजूनही पळत आहेत. धावणे गरजेचे आहे, क्षेत्र कोणतेही असले तरी त्याची गरज असते, असे क्रीडा शिक्षक सांगतात. या मुलींना आता रोज शाळेच्या मैदानावर बोलावता येत नाही पण त्यांनी कसा व्यायाम करावा, याचे नियोजन करून देण्यात आले आहे. त्यामुळे बाभूळगावातील मुली धावताहेत. गेल्या काही वर्षांत गावातही खेळाला प्रोत्साहन देणारे वातावरण बनले आहे.

‘करोना असला तरी धावणे बंद करू नका, कारण एवढे दिवस पैसा हा प्राधान्यक्रम होता. आता प्रकृतीची काळजी हा समाजाचा केंद्रबिंदू झाला आहे. त्यामुळे व्यायाम करा असे सांगणे सोपे झाले आहे. पूर्वी एखाद्या मुलीला क्रीडा प्रकारात पुढे न्यायचे म्हटले तर अडचणी अधिक असत. लग्न झाले की सारे सुटते. आता धावणे किती महत्त्वाचे आहे, हे सांगणे सुरू झाले आहे. अनेक जणी शेतात राहतात, पण रोज सराव करतात.

– सतीश पाटील, क्रीडा शिक्षक, जयहिंद विद्यालय बाभूळगाव, वैजापूर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2020 12:22 am

Web Title: determination of the girls of babhulgaon even during the coronation period encouragement by a sports coach abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 आरोग्य मदतीचा लाभ फक्त २ टक्के रुग्णांना
2 दिल्लीप्रमाणे औरंगाबादमध्ये ‘सिरो’ सर्वेक्षण
3 रक्तद्रव उपचार पद्धती मार्गी लागेल
Just Now!
X