पुतळा उभारणीचे नवे तंत्रज्ञान औरंगाबादमध्ये विकसित

जगप्रसिद्ध वेरुळ आणि अजिंठा लेणीतील एक लेणं उभारण्यासाठी किती दिवस लागले असतील, याचे वेगवेगळे अभ्यासक निरनिराळे उत्तर देतील. पण, तीन पिढय़ा ते शिल्प घडविण्यात गेल्या असे मानले जाते. प्रचंड मोठा काळ अनेक अनामिक कलाकारांचे हात त्याला लागले म्हणून ती अचूक कलाकारी साधली गेली. पण, आता ही दीर्घकाळ निगुतीने चालणारी शिल्पकला काही तासांवर आणून ठेवण्याचे तंत्रज्ञान औरंगाबादमध्ये यंत्रमानावाच्या आधारे विकसित होत आहे. ‘ग्राइंड मास्टर’ या कंपनीने यंत्रमानावाच्या (रोबो) साहाय्याने विविध प्रकारचे शिल्प विकसित करण्याचे तंत्रज्ञान आत्मसात केले आहे. या कंपनीने यंत्रमानवाकडून गौतम बुद्ध, डॉ. अब्दुल कलाम यांच्या पुतळ्यासह अगदी गणपतीची लाकडी मूर्तीही यंत्रमानवाकडून तयार करून घेतली आहे. अगदी थर्माकोलपासून ते जैसलमेर दगडासह विविध धातूंवर मूर्ती बनविण्यात आल्या आहेत.

औरंगाबादमधील उद्योगजगतात यंत्रमानवाचा मोठय़ा प्रमाणात वापर सुरू असताना उत्पादनाच्या वेगात मोठे बदल होत आहे. यंत्रमानवाच्या मदतीने किती बारकाईने काम करता येऊ शकते, याचे उदाहरण घालून देता यावे म्हणून समीर केळकर यांनी शिल्पकाम यंत्रमानवाच्या साहाय्याने करण्याचा प्रयोग हाती घेतला. हा प्रयोग भारतात पहिल्यांदा औरंगाबादमध्ये करण्यात आला. आता यंत्रमानव तंत्रज्ञानाच्या उपयोगितेबाबतचे संशोधन सुरू राहावे यासाठी आणि केवळ शिल्पकामासाठी उपयोगी ठरतील असे तंत्रज्ञान ‘ग्राइंड मास्टर’ ही कंपनी देत आहे.

यंत्रमानव शिल्प घडविताना..

यंत्रमानव साधारणपणे सहा दिशांना काम करू शकतो. त्याला जशी आज्ञावली दिली जाते, त्याप्रमाणे तो काम करतो. पण त्याला आज्ञावली कशी द्यायची आणि कोणत्या कामासाठी त्याच्या हातात कोणते अवजार द्यायचे, हे मात्र अभियंते ठरवितात. ‘ग्राइंड मास्टर’चे व्यवस्थापकीय संचालक महेश सहस्रबुद्धे म्हणाले, शिल्पकलेसाठीही यंत्रमानव काम करू शकतो, असा प्रयोग हाती घेतल्यानंतर त्याची कार्यपद्धती ठरविण्यात आली. ज्या व्यक्तीचा पुतळा करायचा असेल किंवा पूर्वीच्या पुतळ्याचे त्रिमितीद्वारे चित्र घेतले जाते. त्या आधारे यंत्रमानवाच्या हातात कोणते अवजार द्यायचे हे ठरविले जाते. अधिक घनता असणारे फोम, थर्माकोल, लाकूड, तांबे किंवा अ‍ॅल्युमिनियम या धातूंवर आतापर्यंत विविध प्रकारचे पुतळे यंत्रमानव करू शकतो, असे प्रयोग करण्यात आले आहे. पारंपरिक यंत्राच्या साहाय्याने केले जाणारे काम करताना माणूस त्या अवजाराला चालविण्याचा दाब आणि वेग ठरवत असतो. पण येथे सगळी आज्ञावली आधीच दिली जाते. आधी एक साचा बनवून घेण्याचे काम यंत्रमानवाला संगणकाच्या मदतीने दिले जाते. सॉफ्टवेअरची भाषा आणि यंत्रमानवाच्या आज्ञावलीत रूपांतरित केल्यानंतर यंत्रमानव ते काम करतो. त्याच्यासमोर एक टेबल असते. तोदेखील हव्या त्या कोनातून फिरणारा असतो. त्यामुळे यंत्रमानवाच्या हालचालींना सातवी दिशा मिळते. परिणामी तो अधिक नीटपणे काम करू शकतो. जर्मनीतील कुका नावाच्या कंपनीने बनविलेल्या रोबोच्या साहाय्याने आता गौतम बुद्धांपासून ते दीनदयाळ उपाध्याय यांच्यापर्यंत अनेक पुतळे आतापर्यंत बनविण्यात आले आहेत. पुतळे बनविणाऱ्या ‘शिल्पम्’ या कंपनीलाही आता यंत्रमानव आणि पुतळा बनविण्याचे तंत्रज्ञान देण्यात आले आहे. त्याचबरोबर गाजियाबाद येथील अजयकुमार गर्ग महाविद्यालयासही असे तंत्रज्ञान संशोधानासाठी देण्यात आले आहे.

खरे तर यंत्रमानवाचा वापर तसा नवा राहिलेला नाही; पण त्याच्याकडून कोणते काम करून घ्यायचे याचे तंत्रज्ञान आवश्यक आहे. येत्या काळात बागेमध्ये फायबरचे पुतळे उभे करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा अधिक उपयोग करता येऊ शकतो. पुतळा कोरताना बऱ्याचदा घर्षणाने ऊर्जा निर्माण होते, तेव्हा विविध प्रकारच्या रसायनाने थंडावा देण्यात येतो.

सूक्ष्म कलाकुसर सोपी

शिल्पकलेत सर्वात अवघड काम असते ते डोळे आणि त्याच्या बुब्बुळांचे कोरीव काम अधिक कलाकुसरीचे. तेही यंत्रमानव करतो. मात्र, त्यासाठी अभियंते त्याचे सारे अभियांत्रिकेचे कौशल्य वापरतात. एखादे शिल्प करायला जेथे पूर्वी पिढय़ा जाव्या लागत आता हे काम काही महिन्यांत करता येऊ शकते. कितीही सूक्ष्म कलाकुसर यंत्रमानवाच्या साहाय्याने करता येऊ शकते, असा दावा अभियंते करतात.

पहिला प्रयोग मथुरेमध्ये

जर्मन आणि इटली या दोन देशांत मूर्तिकलेसाठी यंत्रमानवाचा उपयोग केला जात होता. भारतात पहिल्यांदा औरंगाबाद शहरात अशा प्रकारचे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले. मथुरेमध्ये कृष्ण मंदिराच्या बांधकामामध्ये यंत्रमानवाच्या साहाय्याने एका जर्मन कंपनीने काम केले होते. ते कोरीव काम पाहिल्यानंतर भारतामध्येही असा प्रयोग करता येईल, असे ठरवून ‘ग्राइंड मास्टर’कडून पुतळे बनविण्याचे तंत्रज्ञान विकसित केले. आता अनेक जण हे तंत्रज्ञान आणि यंत्रमानव औरंगाबादहून घेत आहे.