विधानसभा अध्यक्ष हरिभाऊंचा टोला

‘मुंगीच्या पावलांनी चालले आहे, असे म्हटले तर मुंगीचा अपमान होईल, असा विकासकामाच्या गतीवर सणसणीत टोला विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी लगावला. विभागीय पातळीवरील जिल्हा वार्षकि नियोजन बैठकीत ते बोलत होते. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सोमवारी घेण्यात आली.

पाच-पाच, सात-सात वर्षांपासून प्राथमिक आरोग्य केंद्र आणि शाळांचे बांधकाम रखडते. हे निधी असतानाही घडते. मानसिकता बदलायला हवी. फुलंब्री मतदारसंघात एक रस्ता सात वर्षांपासून सुरूच आहे. एक कोटी रुपयांचे काम आहे, पण ते काही पुढे सरकत नाही. मुंगीच्या पावलाने काम चालले आहे असे म्हटले तर तिचाही अपमान होईल, अशा शब्दांत हरिभाऊ बागडे यांनी कानउघडणी केली. त्यांच्या या वक्तव्यावर नंतर कोणी काही बोलले नाही. विकासकामाचा वेग कसा मंदावला आहे, हे सांगणारे बागडे यांचे वाक्य बैठकीनंतर चर्चेचा विषय होता. कामे लवकर संपवा, असा धोशाच बैठकीत मंत्र्यांनी लावला होता. औरंगाबाद शहरातील समस्या म्हणून खासदार चंद्रकांत खैरे यांनी मागणी लावून धरली ती सुभेदारी विश्रामगृहाची. ते सांगत होते, सुभेदारी विश्रामगृहाची अवस्था वाईट आहे. त्याला निधी द्या. नव्याने विश्रामगृह बांधण्यासाठी परवानगी मिळावी, अशी मागणी त्यांनी केली, पण ती अर्थमंत्री मुनगंटीवारांनी फेटाळून लावली. ते म्हणाले, ‘राज्यात कोठेही नवीन विश्रामगृह बांधायचे नाही, असा निर्णय झाला आहे. त्यामुळे दुरुस्तीसाठी जेवढा पैसा लागेल, तेवढा घ्यायचा आणि आनंद मानायचा.’ या कामासाठी पाच कोटींचा निधी मागण्यात आला होता. तो निधी मंजूर करू, असे मुनगंटीवार म्हणाले. रक्कम दिल्यानंतर किती दिवसांत काम पुरे करणार, असेही मुनगंटीवार वारंवार विचारत होते. रक्कम दिली तर चार महिन्यांत काम संपवणार का, असा प्रश्नही त्यांनी केला. तेव्हा अधिकाऱ्यांनी सहा महिने लागतील, असे उत्तर दिले. कामाची गती  मंद असल्याचे निरीक्षण नोंदवत लवकरात लवकर कामे करा, अशा सूचना देण्यात आल्या.