ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्री यांचा विरोध मोडून दसरा मेळावा घेण्याचा चंग बांधला आहे. त्यामुळे गडावर नेमके काय घडणार, याबाबतची अस्वस्थता वाढली आहे. सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हात दोन ठिकाणी शासकीय कार्यक्रमांना हजेरी लावली. मात्र त्यांनी गडाच्या वादावर ‘मौन’ बाळगल्याने सरकारची पंकजा मुंडेंच्या मेळाव्याला ‘मूकसंमती’ असल्याचा कयास बांधला जात आहे. राज्यभरातून लाखोंच्या संख्येने लोक गडावर दाखल होण्याचे ‘नियोजन’ करण्यात आले असून, प्रशासनानेही पोलीस बंदोबस्त वाढवल्याने गडाला छावणीचे स्वरूप आले आहे.

सोमवारी मुख्यमंत्री फडणवीस यांनी गेवराई व आष्टी येथील दोन शासकीय कार्यक्रमांना पंकजा मुंडे यांच्यासमवेत हजेरी लावली. राज्यभर सुरू असलेल्या भगवानगडाच्या वादावर फडणवीस काही बोलतील असे अपेक्षित होते, मात्र पंकजा मुंडे यांच्याप्रमाणेच फडणवीस यांनीही या वादावर ‘मौन’ बाळगणे पसंत केले. त्यामुळे सरकारची नेमकी ‘मूकसंमती’ कोणाला, याचा कयास बांधला जात आहे. पोलीस बळाच्या मदतीने मेळावा यशस्वी करण्यासाठी सरकारची मुंडे यांना साथ असल्याचाही अंदाज व्यक्त केला जात आहे. पंकजा मुंडे यांनी राज्यभरातून आपल्या समर्थकांना येण्याचे आवाहन केल्याने लाखोंच्या संख्येने लोक दाखल होण्याची शक्यता आहे. अनुचित प्रकार घडू नये यासाठी पंकजा मुंडेंचे मेळाव्याचा टी शर्ट असणारे पन्नास हजार शांतिदूत गडावर दाखल होणार असून, यासाठी सामाजिक माध्यमातून मेळाव्याची आचारसंहिता प्रसारित करण्यात आली आहे. कोणी कितीही भांडण करण्याचा प्रयत्न केला तरी त्याला शांत करण्याचे, इतरांना मदत करण्याचे आणि मेळावा यशस्वी करण्यासाठी तत्पर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

गोपीनाथगडावरून खासदार प्रीतम मुंडे मंगळवारी सकाळीच दहा हजार मोटारसायकलींची रॅली घेऊन रथयात्रेद्वारे भगवानगडावर जाणार आहेत. या रथयात्रेत मोठय़ा संख्येने वाहने असणार आहेत.

दरम्यान, पोलीस प्रशासनाने प्रतिबंधात्मक कारवाईची बजावलेली नोटीस गडाचे महंत नामदेवशास्त्री यांनी स्वीकारली नाही. परंतु गडाच्या पायथ्याशी असलेल्या अनेक गावांमध्ये रात्रीपासून धरपकड सुरू केली असून, चाळीस जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तीनशेपेक्षा जास्त लोकांना प्रतिबंधात्मक नोटीस बजावण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. मंगळवारी गडावर ड्रोन कॅमेऱ्याद्वारे पोलीस प्रशासन लक्ष ठेवणार असून, या भागाचे पूर्ण चित्रीकरण करण्यात येणार आहे.

 

भगवानगडाला पोलीसगडाचे स्वरूप

खोत व जानकर हेही मुंडे यांच्यासमवेत; नामदेवशास्त्रींसह ४०० जणांना नोटिसा

नगर : राज्यातील वंजारी समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या नगर आणि बीड जिल्हय़ाच्या हद्दीवरील भगवानगडाला भल्यामोठय़ा पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. हा गड पोलिसांनीच ताब्यात घेतल्यासारखी परिस्थिती असून, मंगळवारी साजऱ्या होणाऱ्या दसरा उत्सवावर वादाचेच सावट आहे. दरम्यान, कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने एकीकडे गडाचे महंत नामदेवशास्त्री यांच्यासह तब्बल ४०० जणांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या आहेत, तर दुसरीकडे ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यासह पणनमंत्री सदाभाऊ खोत व पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर हेही मंगळवारी दसरा मेळाव्याला हजेरी लावणार आहेत.

पंकजा मुंडे व नामदेवशास्त्री यांच्यातील वादाला आता टोकाचे स्वरूप आले असून, गडावरील दसरा उत्सवास राजकीय मेळाव्याचे स्वरूप येऊ नये या भूमिकेवर नामदेवशास्त्री ठाम आहेत, तर आपण गडावर जाणार व भाषण करणारच, असा आक्रमक पवित्रा मुंडे यांनी घेतल्याने मंगळवारी होणाऱ्या दसरा उत्सवाच्या निमित्ताने राज्याचे लक्ष भगवानगडाकडे लागले आहे.

गडाच्या मार्गावर चौक्या

येथील वाढता तणाव लक्षात घेऊन पोलिसांनी गड जवळजवळ ताब्यात घेतल्यासारखीच परिस्थिती आहे. गडावरील नेहमीची सभेची जागाच पोलिसांनी येथे बॅरेकेटिंग टाकून सील केल्यासारखी स्थिती आहे. मंगळवारी तेथे कोणालाही जाऊ दिले जाणार नाही. गडावर दोन मुख्य प्रवेशद्वार असून, त्यावर पोलिसांचेच नियंत्रण राहील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

गडावर येणाऱ्या-जाणाऱ्यांसाठी या दोन प्रवेशद्वारांचा एकेरी वापर करण्यात येणार आहे. तरीही ग्रामविकासमंत्री मुंडे यांच्यासमवेतच मोठय़ा संख्येने समर्थक आले तर काय, हा प्रश्न पोलिसांसमोर आहेच. नामदेवशास्त्री यांच्या गडावरील निवासस्थानालाही मोठा बंदोबस्त देण्यात आला असून, त्याच्या ५० फूट अलीकडेच लोखंडी कठडे लावून हा रस्ताच बंद करण्यात आला आहे. गडाच्या तटबंदीचा ताबा पूर्णपणे पोलिसांनीच घेतला असून, मंगळवारी दसरा उत्सवात या तटबंदीवर कोणालाही जाऊ दिले जाणार नाही. तेथे पोलीसच तैनात करण्यात येणार आहेत. गडाच्या पूर्ण परिसरात पोलिसांनी १५ व देवस्थानकडून ३५ असे सुमारे ५० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

पाथर्डी तालुक्यातील खरवंडी, कोरगाव व निंबेनांदूर अशा तीन मार्गानी गडावर जाता येते. या तिन्ही मार्गावर चौक्या उभारण्यात आले असून, येथे प्रत्येकाची तपासणी करूनच सोडण्यात येणार आहे.

प्रशासनाची तयारी

  • बंदोबस्ताच्या दृष्टीने ही कार्यवाही करतानाच पोलीस प्रशासनाने नामदेवशास्त्रींसह सुमारे ४०० जणांना प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या आहे. यात भारतीय जनता पक्षाच्याही काही कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
  • दुसरीकडे पंकजा मुंडे यांनीही राजकीय मेळाव्याच्या दृष्टीने जोरदार तयारी केली आहे. त्यांच्यासमवेत सदाभाऊ खोत व महादेव जानकर हे समर्थक मंत्रीही मंगळवारी भगवानगडावर हजेरी लावणार आहेत. जानकर हे सोमवारी रात्री उशिरा नगरला येणार आहेत.
  • येथे मुक्काम करून मंगळवारी सकाळी १० वाजता ते मोटारीने भगवानगडावर जाणार आहेत, तर खोत हे मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता स्वतंत्र हेलिकॉप्टरने गडाच्या पायथ्याशी असलेल्या पांजरी येथे येणार असून, येथून ते मुंडे यांच्यासमवेतच गडावर जातील.
  • पांजरी येथे दोन हेलिपॅड तयार करण्यात आले आहेत. गडावरील राजकीय मेळाव्यास उपस्थित राहण्यासाठी सोमवारी पाथर्डी तालुक्यात व बीड जिल्हय़ातही भोंगा लावून वाहने फिरवण्यात आली. वाडीवस्तीवर जाऊन ही वाहने हे आवाहन करीत आहेत.
  • तसेच परळीहून येणाऱ्या रथासह गडावर प्रवेशाचा पंकजा मुंडे यांचा प्रयत्न आहे. हाही वादाचा नवा मुद्दा ठरण्याची चिन्हे आहेत. गडावरील दसरा उत्सव किंवा मेळाव्यात रथाची प्रथा नाही, मात्र गडावर सभेची व्यवस्था न झाल्यास या रथावरील ध्वनिक्षेपकावरच सभा घेतली जाण्याची शक्यता व्यक्त होते.