‘अशा गोष्टी लक्षात ठेवायच्या नसतात’, असे म्हणत गेल्या वर्षीच्या अजित पवार यांना बरोबर घेऊन मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याच्या त्या रणनितीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य करण्याचे टाळले. तो क्षण पुन:पुन्हा आठवतो का, या प्रश्नावर, पत्रकारच त्याची आठवण करून देतात, असेही फडणवीस म्हणाले.

सध्या सरकार किती दिवस टिकेल सांगता येणार नाही, पण पुढे जेव्हा सरकार बनेल तेव्हा ते उजेडातील असेल, असेही ते एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले. मराठवाडय़ाकडे हे सरकार दुर्लक्ष करीत असल्याचाही आरोप त्यांनी केला. पदवीधर मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारासाठी औरंगाबाद येथे आयोजित मेळाव्यापूर्वी ते  बोलत होते.  औरंगाबाद शहरातील पाणी पुरवठय़ाच्या योजनेस दिलेला १६८० कोटीचा निधी, रस्त्यांसाठी भाजप सरकारकडून देण्यात आलेल्या निधींचे उल्लेख त्यांनी केला. समुद्रात वाहून जाणारे १६७ अब्ज घनफूट पाणी मराठवाडय़ात आणण्यासाठी गोदावरी खोऱ्याच्या जलआराखडय़ात तरतुदी केल्या.  हे सरकार मात्र केवळ काही जिल्ह्य़ांपुरते आणि मतदारसंघांपुरतेच काम करत असल्याचे फडणवीस म्हणाले.

‘सरकारला कौल नाही’

केवळ चार वर्षे नाही, तर अनेक वर्षे हे सरकार चालेल या उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर फडणवीस म्हणाले, ‘त्यांना जनतेने कौल दिलेला नाही. त्यांनी कितीही स्वप्न पाहिली तरी बेईमानीने आलेले हे सरकार आहे. मदिरालये सुरू होतात, चित्रपटगृहे सुरू होतात आणि मंदिरे सुरू करा असे म्हटल्यावर त्यांना राग का येत होता. मंदिरांमध्ये अंतर नियमांचे उल्लंघन होत असेल तर  कारवाई केली जावी, पण मंदिरे उघडण्याची मागणी योग्य होती,’ असेही फडणवीस  म्हणाले.

पंकजा यांच्या नाराजीचे खंडन

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीपूर्वी पंकजा मुंडे नाराज असल्याचे वृत्त येत होते. मात्र, त्यात तथ्य नसल्याचे फडणवीस म्हणाले. शिरीष बोराळकर यांना गेल्या वेळी गोपीनाथ मुंडे यांनी उमेदवारी दिली होती.  बोराळकर यांनी ६४ हजार मते घेतली होती. त्यांच्या प्रचाराच्या एका कार्यक्रमास त्या नव्हत्या म्हणून त्या नाराज आहेत, असे म्हणणे चूक आहे. बातम्यांसाठी मजकूर कमी पडल्यावर पंकजा मुंडे नाराज असे लिहिले जाते. आम्ही दुसऱ्या बातम्या देऊ असे म्हणत पंकजा मुंडे नाराज असल्याचे फडणवीस यांनी खंडन केले.