महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना कुख्यात गुंड दाऊद इब्राहीमचे फोन आले असतील, तर ती गंभीर बाब आहे. या प्रकरणात ते खरोखर स्वच्छ असतील, तर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जावे, असे मत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित दुष्काळ परिषदेनिमित्ताने येथे आले असता मुंडे पत्रकारांशी बोलत होते. ज्येष्ठ नेते कमलकिशोर कदम, माजी मंत्री गंगाधरराव कुंटूरकर, जि.प.चे उपाध्यक्ष दिलीप धोंडगे, दत्ता पवार यांची या वेळी उपस्थिती होती. खडसे यांचे सचिव म्हणविणारे गजानन पाटील, तसेच गृह विभागाचे सचिव खेडेकर हे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या जाळ्यात अडकले असले, तरी मंत्रालयात असे अनेक गजानन पाटील व खेडेकर आहेत. ज्या भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावर हे सरकार निवडून आले, तेच सरकार आता भ्रष्टाचार करीत आहे असे वाटते, अशा शब्दांत मुंडे यांनी युती सरकारवर निशाणा साधला.
‘नीट’बाबत राज्य सरकारने काढलेला अध्यादेश खरा का खोटा या बद्दल शंका व्यक्त करून मुंडे म्हणाले, की शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील २ हजार ८१० जागा आहेत. नीट रद्द झाल्यामुळे या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार असला, तरी खासगी वैद्यकीय महाविद्यालयांतील ३ हजार ३९५ ‘नीट’ लागू राहणार आहे. अभिमत विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांनाही या निर्णयाचा फायदा मिळणार नाही. त्यामुळे आजही गोंधळाचे वातावरण कायम आहे. विद्यार्थी-पालक संभ्रमात आहेत. केंद्र व राज्य सरकारला या बाबत मदत करायची असेल, तर सरसकट सर्व विद्यार्थ्यांना नीटमधून दिलासा द्यावा. २०१४-१५ व २०१५-१६ या दोन्ही वर्षांच्या दुष्काळात मनरेगाची कामे झाली नाहीत. जेथे थोडीफार कामे झाली, तेथे १०० टक्के भ्रष्टाचार झाला आहे. या बाबतच्या तक्रारींची चौकशी करावी, अशी मागणी मुंडे यांनी केली. जलयुक्त शिवार योजनेची कामे प्रत्यक्षात कुठेच झाली नाहीत. सरकारची महत्त्वाकांक्षी असलेली ही योजना केवळ कागदावरच आहे. कामे झाली किंवा नाही, हे येत्या पावसाळ्यातच दिसणार आहे. दुष्काळाची स्थिती अजूनही गंभीर असून दुष्काळ निवारणाबाबत सरकार अपयशी ठरले आहे. लोकांना पिण्याचे पाणी देण्यातही सरकार कमी पडले आहे, असा आरोप त्यांनी केला.
विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होणार काय, या बाबत विचारले असता ‘याचे उत्तर प्रदेशाध्यक्ष देऊ शकतील,’ असे मुंडे यांनी या वेळी स्पष्ट केले. मुंडे यांच्या येथील वास्तव्यात काँग्रेसचे आमदार अमरनाथ राजूरकर यांनी त्यांची भेट घेतली. या भेटीत काय चर्चा झाली, ते समोर आले नाही.