पावसाळा संपत आला तरी जिल्ह्यात अद्याप पुरेसा पाऊस पडला नसल्यामुळे पाण्याची गंभीर परिस्थिती कायम आहे. एकाही प्रकल्पात पाणीसाठवण झाले नाही. त्यामुळे अनेक गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. त्यामुळे जिल्ह्यात सरकारने कृत्रिम पावसाचा प्रयोग करावा आणि जायकवाडीचे पाणी माजलगाव धरणात सोडावे, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

बीड येथे शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युवक आघाडी कार्यकर्ता शिबिर धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत झाले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, राज्यात सर्वत्र चांगला पाऊस झाला आहे. मात्र बीड जिल्हा अद्यापही कोरडाच आहे. पावसाळ्याचे तीन महिने होत आले तरी पाणी वाहील असा पाऊस पडला नाही. परिणामी एकाही धरणातील पाणीसाठय़ात वाढ झाली नसून धरणे पूर्णपणे कोरडी आहेत.

अनेक गावांना, वाडय़ांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. त्यामुळे पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारने जिल्ह्यात तत्काळ कृत्रिम पाऊस पाडावा आणि जायकवाडीच्या धरणातील पाणी माजलगाव धरणात सोडावे, अशी मागणीही त्यांनी केली.