शिवसेना ही सत्तेसाठी लाचार झाली असून शिवसेनेची लायकी राहिली नाही. भाजपाने त्यांना शपथविधी कार्यक्रमाला बोलावले नव्हते. केवळ पाच मंत्री पदाचे तुकडे त्यांना देण्यात आले. शिवसेनेची अवस्था वाघासारखी न राहता शेळीसारखी झाली आहे. शिवसेनेने मराठा समाजाने आपल्या मागण्यासाठी सरकार विरुद्ध शांतपणे काढलेल्या मोर्चाला ‘मुका घ्या मुका’ छापून कुठे नेऊन ठेवले, असा सवालही विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पूर्णेच्या प्रचारसभेत केला.

पूर्णा नगरपरिषदेच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आज सोमवारी येथील मोंढा बाजार येथे धनंजय मुंडे यांची प्रचार सभा घेण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हरिभाऊ कदम होते. तर व्यासपीठावर आमदार रामराव वडकुते, आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे, तालुका अध्यक्ष शहाजी देसाई, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शाहिस्ता जाकेर कुरेशी, शहराध्यक्ष अखिल अहमद, रितेश काळे, शेख खुद्दूस, माजी सभापती दिगंबर कऱ्हाळे, गोिवद िशदे आदी उपस्थित होते.

मुंडे म्हणाले की, पूर्णा शहराचा मॉडेल शहर म्हणून विकास करण्यात येईल. पूर्णा शहराच्या विकासाची जबाबदारी घेऊन विकासकामे केली जातील, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पूर्णा येथील मोंढा बाजारात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादीच्या प्रचारसभेत बोलताना केले.

याप्रसंगी बोलताना आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे म्हणाले की, विशाल कदम यांना राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष केले व त्यांच्याकडे तालुका अध्यक्षपदही सोपवले. तरीपण ते सत्ता असेल तिकडे जातात, अशी टीका करून त्यांनी अशा लोकांना जनतेने धडा शिकवावा व राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. हबीब यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहाजी देसाई यांनी केले.