बीड बँकेमधील १४२ कोटींचा गैरव्यवहार; १०५ जणांवर आठवडाभरात दोषारोप निश्चिती
बीड जिल्हा बँकेच्या १४२ कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात अडकलेल्या १०५जणांची चौकशी करून या आठवडय़ाच्या शेवटी दोषारोप निश्चिती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. या प्रकरणात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे उद्या (बुधवारी) त्यांचे म्हणणे सादर करण्यासाठी उपस्थित राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी लाभधारक संस्थांचे संचालक व जिल्हा बँकेच्या आजी-माजी १०५ जणांना नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलावून घेतले होते. मंगळवारी दिवसभरात २०जणांनी त्यांचे म्हणणे नोंदवले. या गरव्यवहारात प्रत्येक व्यक्तीचा सहभाग कशा स्वरुपाचा, त्याच्या विरोधात कोणते पुरावे याची छाननी केल्यानंतर विशेष तपास पथक दोषारोप निश्चित करेल, असे नांगरे पाटील यांनी सांगितले.
बीड जिल्हय़ातील आमदार अमरसिंह पंडित, खासदार रजनी पाटील, माजी मंत्री सुरेश धस यांच्यासह सर्वच बडय़ा पुढाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या. न्यायालयाने तपास यंत्रणांवर ताशेरे ओढल्यानंतर सुरू झालेल्या चौकशीला सोमवारी रात्री गती देण्यात आली. ११ प्रकरणांमध्ये ३९ संचालकांना नव्याने आरोपी करण्यात आले. हीच प्रक्रिया बुधवारी व गुरुवारी होण्याची शक्यता आहे.
बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सन २०११-१२मध्ये बनावट व बेकायदा कर्ज प्रकरणानंतर तत्कालीन प्रशासक शिवानंद टाकसाळे यांनी १४१ कोटी रुपयांच्या गरव्यवहार प्रकरणी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये १३१ गुन्हे दाखल केले. तत्कालीन बँकेचे अध्यक्ष राजाभाऊ मुंडे यांच्यासह बहुतांश संचालकांवर गुन्हे दाखल झाल्याने त्यांना तुरुंगवारी करावी लागली. मात्र, पोलिसांकडून तपास होत नसल्याने आणि दिग्गज राजकीय नेत्यांना अटक होत नसल्याने काँग्रेसचे हरिभाऊ सोळंके यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. न्यायालयाने गुन्ह्यच्या तपासासाठी विशेष पथकाची स्थापना केली. विश्वास नांगरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाच्या तपासकामावर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. त्यानंतर खासगी तपास एजन्सीची मदत घेण्यात आली.

असा आहे घोटाळा
जिल्हा बँकेकडून सहकारी संस्था अस्तित्वात नसताना ११ कोटी रुपये तत्कालीन अध्यक्ष राजाभाऊ मुंडे यांनी उचलल्याची तक्रार संचालक धैर्यशील सोळंके यांनी केली होती. या प्रकरणात दाखल गुन्ह्य़ात त्यांनी हर्सुल कारागृहात तीन वष्रे शिक्षाही भोगली. असे केवळ एकच प्रकरण नाही, तर एकूण १३१ गुन्ह्य़ांत तब्बल १४२ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे.