सेव्ह नेशनच्या पदाधिकाऱ्यांनाही काही तास बसवून ठेवले

औरंगाबाद : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा मंगळवारी औरंगाबादेत दाखल झाली. तत्पूर्वी आरक्षणासह इतर मागण्यांसाठी धनगर समाजाच्या वतीने काळे झेंडे दाखवण्यासह सभेच्या मार्गावर मेंढय़ा आणण्यात येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांकडून सकल धनगर समाजातील काही नेत्यांसह भाजप व रासपच्याही पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी स्थानबद्ध केले. याशिवाय ५० टक्क्यांवरील आरक्षणाविरोधात चळवळ उभी केलेल्या सेव्ह मेरिट सेव्ह नेशन, या अभियानातील पदाधिकाऱ्यांनाही काही तास पोलीस आयुक्तालयात थांबवून घेतले होते.

सेव्ह मेरीट, सेव्ह नेशन या चळवळीतील पदाधिकाऱ्यांकडून औरंगाबादेतील सिल्लेखाना चौकात मंगळवारी सायंकाळी मानवी साखळी करून वाढीव आरक्षणाला विरोध दर्शवण्यात येणार होता. त्या संबंधीचे निवेदन देण्यासाठी विजया अवस्थींसह इतर काही पदाधिकारी पोलीस आयुक्तांकडे गेले होती. मात्र, त्यातील काहींना तेथेच थांबवून घेण्यात आले. काहींचा मोबाइल पोलिसांनी जवळ ठेवून घेतला. याची माहिती चळवळीतील काही पदाधिकाऱ्यांकडे गेली. त्यानंतर डॉ. रूपाली धर्माधिकारी, अनिल मुळे, डॉ. वंदना काबरा, धीरज पटेल आदी पोलीस आयुक्तालयात दाखल झाले. त्यांनी पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांची भेट घेतली. या भेटीनंतर पोलीस आयुक्तांनी मानवी साखळी करण्यास परवानगी दिल्याचे डॉ. वंदना काबरा आणि डॉ. रूपाली धर्माधिकारी यांनी सांगितले.

धनगर समाजातील नेत्यांकडून आरक्षणाच्या मुद्दय़ावर मुख्यमंत्र्यांच्या सभेत मेंढय़ा आणून काळे झेंडे दाखवण्यात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सकल धनगर समाजाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष अरुण रोडगे, भाजपचे पदाधिकारी आणि धनगर आरक्षण चळवळीतील नेते रंगनाथ राठोड, कैलास रिठे, रासपचे दिलीप रिठे, डोळस यांना औरंगाबादेतील एमआयडीसी, जवाहनगर, वेदान्तनगर पोलीस ठाण्यात तर फुलंब्रीत कैलास गायके यांना स्थानबद्ध केले. दरम्यान, धनगर समाजाच्या पदाधिकाऱ्यांना स्थानबद्ध केल्याची घटना निंदनीय असून त्याचा यशवंत सेनेच्या वतीने निषेध करण्यात येत आहे, अशी प्रतिक्रिया भारत सोन्नर यांनी दिली.

काळे झेंडे दाखवण्यासह मेंढय़ा मुख्यमंत्र्यांच्या सभेत पाठवणार असल्याचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे कुठलेही लेखी निवेदन दिले नव्हते. तरीही मंगळवारी पहाटे चारपासून आम्हाला स्थानबद्ध केले. अनेकांचे मोबाइल पोलिसांनी हिसकावून घेतले. मात्र आपण मोबाइल देण्यास विरोध केला. त्यामुळे माझ्याशी कार्यकर्त्यांचा संपर्क तरी होऊ शकला.

– अरुण रोडगे, सकल धनगर समाज, विभागीय अध्यक्ष