केंद्राच्या योजनांच्या प्रचारासाठी दोन मंत्र्यांचा पंचतारांकित दौरा’; सामान्य मात्र दूरच

कर्जमाफीच्या मुद्दय़ावरून राज्यात संतापाची लाट असताना केंद्र सरकारच्या तीन वर्षांतील यशस्वी योजनांचा ढोल वाजविण्यासाठी दोन केंद्रीय मंत्र्यांचा औरंगाबाद दौरा झाला. पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान आणि रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी त्यांच्या विभागाच्या योजनांची माहिती सर्वसामांन्याना कळेल, अशा भाषेत दिली. एका बडय़ा हॉटेलमध्ये ‘सबका साथ सबका विकास सम्मेलन’ केले. योजनांच्या माहितीचा ढोल तर वाजवला पण कर्जमाफीसह विविध मागण्यांच्या नादात त्याचा आवाज मात्र  घुमला नाही. मराठवाडय़ात तर तो आवाज क्षीण वाटावा, एवढा हळू होता.

सरकारने केलेल्या कामाची उजळणी करताना प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे दोन्ही मंत्र्यांबरोबर उपस्थित होते. केलेले काम सांगणे कसे महत्त्वाचे असते, असे सांगत दर वर्षी सरकार कशी चांगल्या कामामध्ये भर टाकत आहे, हे सांगण्यात कोणीच कसर ठेवत नव्हते. प्रदेशाध्यक्ष दानवे सभेत बोलायला लागले की, सामान्य माणसाच्या मनाचा ठाव घेतात. ते उज्वला योजनेचे महत्त्व सांगत होते, ‘एखाद्या महिलेला जळण आणायाचे असेल कमीत कमी वीस-पंचवीस मिनिटे लागतात. पण त्या त्रासातून तुमची सुटका केली आहे. कोणी केली आहे? – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी. आता मोफत गॅस मिळाला आहे. त्यावर मोठय़ा भगोन्यात (पातेल्यामध्ये) चहा करा. शेजार-पाजारच्या माणसांना बोलवा. त्यांना सांगा, कोणी गॅस दिला?’ प्रदेशाध्यक्ष दानवेंच्या नंतर पेट्रोलियम मंत्री धर्मेश प्रधान यांनी उज्ज्वला योजनेचे महत्त्व हिंदीतून सांगितले. सर्वसामांन्य गरीब माणसाबद्दल पंतप्रधानांच्या मनात कशी कणव आहे, हे ते सांगत होते. उपस्थित जनसमुदायामध्ये भाजपप्रति भारावलेपण यावे, असे सारे वातावरण निर्माण करण्यात आले. पण, हे सारे घडले ते एका बडय़ा हॉटेलमध्ये. खरे तर तीन वर्षांच्या यश सांगण्यासाठी आयोजित मेळावा बंदिस्त हॉलमध्ये कशासाठी, याचे मात्र कोडेच होते.

एका बाजूला तीन वर्षांच्या यशस्वी योजनांचा जल्लोष सुरू होता. त्याच औरंगाबाद जिल्ह्य़ातील जयाजी सूर्यवंशी यांनी घडवून आणलेली तडतोड नाकारून शेतकऱ्यांनी पुन्हा संपाला सुरुवात केली होती. गावोगावी रस्ता रोको सुरू होते. मुख्यमंत्र्यांचे पुतळे जाळले जात होते. ‘साले’वरून समाजमाध्यमांमध्ये प्रतिक्रिया सुरूच होत्या. संपाला शहरामध्ये संमिश्र प्रतिसाद असताना योजनांचे ढोल बडविले जात होते. सर्वसामान्यांमधून मिळणारा प्रतिसाद मेळाव्यातील उपस्थितीवरून ठरविला जात होता. या मेळाव्यात मुस्लीम महिलांची उपस्थिती असावी, असेही प्रयत्न करण्यात आले होते. धर्मेद्र प्रधानांपूर्वी मराठवाडय़ात केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आले होते. त्यांनी मराठवाडा विभाग दक्षिण मध्य रेल्वे विभागातून वगळून तो मध्य विभागामध्ये घेण्याची मागणी योग्य असल्याचे म्हटले. मात्र, मागणी मान्य करताना इतर विभागाचा विचार करणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्यांनीही पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली देशाची देदीप्यमान प्रगती होत असल्याचे सांगितले. पीपीपी प्रकल्पाच्या माध्यमातून होणारा रेल्वेचा विकास, वीजबचतीतून होणारा रेल्वेचा नफा सांगत उद्याची गरज ओळखून हे सरकार काम करत असल्याचे सांगितले. तीन वर्षांच्या कामाचा आढावा देताना पत्रकांराच्या प्रश्नाला उत्तरे देण्याची त्यांची तयारी होती. मात्र, या दोन्ही केंद्रीय मंत्र्यांनी केंद्र सरकारच्या कामाचा ढोल तर वाजवला पण त्याचा आवाज काही मोठा झाला नाही. शेतकऱ्यांच्या समस्या, त्यांनी पुकारेला संप यामुळे मंत्री आले आणि हॉटेलात मेळावा घेऊन परतले.