पाशाभाई रापी घेऊन चामडी आकारात कापत होते. गेली २५ वष्रे ते वाद्य तयार करतात. गणपती आले आणि त्यांनी ढोल बनवायला हाती घेतले. आता चामडीपासून तयार होणारे ढोल फारसे तयार होत नाहीत. ते करण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल झाले आहेत. जनावरांची चामडी काढणे, ती वाळवणे, मग त्यापासून ढोल बनविणे हे सारे बंद झाले आहे. आता प्लास्टिक फिल्म कापून ती गोल पत्र्यावर लावली की अध्र्यातासात ढोल तयार होतो. आताशा चामडीचा ढोल द्या, अशी मागणीही कोणी करत नाही. त्यात गोवंश हत्या बंदी असल्याने गरवारेंच्या फिल्मपासून बनविलेले ढोल कसे चांगले आहेत, हेच दिल्ली तबलेवालेचे मालक शेख मतीन आवर्जून सांगतात. गणेशाचे आगमन सोमवारी असल्याने ढोल तयार करण्याच्या कामाला कमालीचा वेग होता.

गणेशाच्या स्वागतासाठी ढोल वाजविण्याचा सराव तसा १५ दिवसांपासून सुरू झाला आहे. रात्रीपर्यंत गणेश मंडळाचे कार्यकर्ते वेगवेगळय़ा तालात त्याचा सराव करत असतात. त्यांचा तो स्वागताचा आवाज अधिक घुमावा म्हणून शेख मतीन आणि पाशाभाई शनिवारी कमालीचे व्यस्त होते. शेख मतीन सांगत होते, आता ढोल बनविणे तसे सोपे झाले आहे. नटबोल्टने आवळून प्लास्टिक ताणले की, नाशिक ढोल तयार होतो. दोऱ्यांच्या साहाय्याने गरवारे प्लास्टीक ताणले की पुणे आणि मुंबईचा ढोल तयार होतो. ढोल वेगवेगळय़ा आकारात उपलब्ध आहेत. किमतीही तुलनेने कमी झाल्या आहेत. हजार-बाराशे रुपयांत मोठा ढोल मिळतो. त्यामुळे गणेशाच्या आगमनानिमित्त ढोल नेहमीप्रमाणे चांगलाच घुमेल. हा व्यवसाय गणेशोत्सवात चांगलाच बहरतो. ढोल बनविण्यासाठी लागणारा पत्रा ६० रुपये किलोने मिळतो. एक दुकानदार ५० ते ६० क्विंटल पत्रा विकत घेतो. प्लास्टीकचे रोल मिळतात. ते योग्य आकारात कापले की ढोल तयार करणे तसे सोपे काम असल्याचे शेख मतीनही सांगतात. औरंगाबाद शहरातील पैठणगेट भागात ढोल विक्रीची दुकाने आहेत. येथे ताशाही मिळतो. त्याचेही अनेक प्रकार आहेत. गंगा-जमुना आणि स्टीलच्या ताशांची खरेदी काही प्रमाणात झाली असली तरी विसर्जनापर्यंत ढोल विक्रीतून लाखोंची उलाढाल होणार आहे.