ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांची खंत

चित्रपट परिनिरीक्षक मंडळाकडून एखाद्या अश्लील दृश्यावर लावलेली कात्री समजू शकतो. परंतु एखादा हिरो दहा-दहा गुंडांना मारधाड करतो हे वास्तविकदृष्टय़ा अवास्तव असले तरी त्याला मंडळाकडून कात्री लागत नाही. त्यामुळे हा प्रकार समाज घडवणारा नसून बिघडवणारा आहे, असे स्पष्ट मत ज्येष्ठ चित्रपट व नाटय़ दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी येथे व्यक्त केले.

येथील महात्मा गांधी मिशनमधील (एमजीएम) पत्रकारिता विभागात रविवारी ‘सिनेमा, समाज आणि सेन्सॉरशिप’ या विषयावर आयोजित परिसंवादात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. वि. ल. धारूरकर होते. या प्रसंगी एमजीएमचे सचिव अंकुशराव कदम, ज्येष्ठ पत्रकार प्रशांत दीक्षित, डॉ. दिलीप घारे, प्राचार्या रेखा शेळके, डॉ. विशाखा गारखेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

चंद्रकांत कुलकर्णी म्हणाले, चित्रपट पाहिल्याने समाजाच्या कृतीचे निरीक्षण साधणारी दृष्टी विकसित होते. समाजाभिमुख चित्रपट निर्माण होऊन त्याची कारणमीमांसा होणे गरजेचे आहे. आयुष्याची समज वाढवणारे माध्यम म्हणून नाटक, चित्रपटांकडे पाहिले जाते. परंतु त्यातील काही दृश्यांना कात्री लागत असल्याने नेमके जे पोहोचायला हवे तेच प्रेक्षकांपर्यंत जात नाही. चित्रपटातील अश्लील भाग परिनिरीक्षक मंडळ कापण्यास लावते. ते काही वेळेला समजू शकतो. परंतु एखादा नट दहा-दहा गुंडांना मारपीट करतो हे जरा अतार्किक वाटत असतानाही त्यावर कात्री लावली जात नाही. आजचा दिवस माझा, मुरांबा या सारख्या चित्रपटांच्या काही दृश्यांवर मंडळाने आक्षेप घेतल्याकडे लक्ष वेधून कुलकर्णी यांनी नको ते चित्रपट कात्रीतून सुटत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. यामागे काही प्रस्थापितांचा दबाव असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही मत कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

परिसंवादाच्या दुसऱ्या सत्रात प्रा. जयदेव डोळे यांनीही चित्रपट परिनिरीक्षक मंडळाच्या कारभारावर टीका केली. मंडळाची कृती इंग्रजांच्या राजवटीप्रमाणे असल्याची शंका येत असल्याचे सांगत प्रा. डोळे यांनी चित्रपट कलेसाठी की समाजासाठी, याचा वाद ब्रिटिश कालावधीपासून सुरू असल्याचे सांगितले. स्त्रियांना दुय्यम वागणूक देणे हे आपल्या चित्रपट क्षेत्राचे केंद्रस्थान राहिलेले असल्याचे ते म्हणाले. चित्रपट परिनिरीक्षक मंडळ ही पूर्णपणे राजकीय संस्थाच बनल्याची टीकाही प्रा. डोळे यांनी केली.