डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने बुधवारी व उद्या (गुरुवारी) असे दोन दिवस चालणाऱ्या आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिराच्या रंगीत तालीमचे उद्घाटन झाले. वित्त व लेखाधिकारी डॉ. मो. सय्यद अझरुद्दीन यांच्या हस्ते हे उद्घाटन झाले.
मुंबईच्या नाथीबाई ठाकरसी महिला विद्यापीठात जून महिन्यात झालेल्या आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिरात राष्ट्रीय सेवा योजनेचे १२० स्वयंसेवक सहभागी झाले होते. त्याचीच रंगीत तालीम विद्यापीठात घेण्यात येत आहे. या विद्यार्थ्यांना नंदकिशोर मांडवकर, प्रा. जीवन गाडे, गणेश राजे प्रशिक्षण देत आहेत. नैसर्गिक आपत्तीत स्वयंसेवकांनी झोकून देऊन मदतकार्य करायला हवे, अशी अपेक्षा डॉ. अझरुद्दीन यांनी या वेळी व्यक्त केली. प्रा. प्रकाश तुरुकमाने, डॉ. राजेश रगडे यांचेही मार्गदर्शनपर भाषण झाले. अध्यक्षीय समारोपात डॉ. राम चव्हाण यांनी, राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांकडे सामाजिक भान असते. आदेशाची वाट न पाहता ते उत्स्फूर्त काम करतात, असे सांगितले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी हरिहर पत्की, डॉ. विकास देशमुख आदी उपस्थित होते.