औरंगाबाद : शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील असुविधांचा पाढा आज लोकप्रतिनिधींनी पालकमंत्री सुभाष देसाई यांच्यासमोर वाचला. मराठवाडय़ासह १० जिल्ह्य़ांतून येणाऱ्या रुग्णांना औषधाचा पुरवठा पुरेसा होत नाही. तसेच एमआरआय मशीन अधूनमधूनच चालू असते. बहुतांश वेळा बाहेरून औषधे आणायला लावतात. काही यंत्रेही बंद आहेत. त्यामुळे तातडीने घाटी रुग्णालयातील समस्यांकडे पालकमंत्र्यांनी लक्ष घालावे, अशी विनंती केल्यानंतर २६ जानेवारी रोजी घाटी रुग्णालयाची पाहणी करू, असे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी जाहीर केले.

दोनशे खाटांच्या रुग्णालयासाठी पाठपुरावा केला जात असून हे रुग्णालय अधिक सुसज्ज व्हावे यासाठी प्रयत्न केले जातील, असे देसाई यांनी सांगितले. आरोग्य आणि शिक्षण या विभागांकडे अधिक लक्ष दिले जाईल, असे ते म्हणाले. जिल्ह्य़ातील ३९३ शाळांमधील वर्गखोल्या अतिवृष्टीमुळे खराब झाल्या असून, तातडीने त्या बांधण्यासाठी लागणारा निधी जिल्हा नियोजन आराखडय़ातून पूर्ण करता येणे शक्य होणार नाही. त्यामुळे अधिकच्या तरतुदीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात येईल.  याशिवाय इम्फोसिससारख्या संस्थांकडून शिक्षणासाठी अधिकचा निधी मिळेल काय, याची चाचपणी केली जात आहे, असेही देसाई यांनी सांगितले. या बैठकीस रोजगार हमी मंत्री संदिपान भूमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, खासदार इम्तियाज जलील, आमदार प्रशांत बंब, उदयसिंह राजपूत आदींची उपस्थिती होती.

रस्त्यांच्या कामाची तक्रार

औरंगाबाद शहरातील बीबी का मकबरा या पर्यटन स्थळाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम अलीकडेच पूर्ण झाले असले तरी ते निकृष्ट असल्याची तक्रार लोकप्रतिनिधींनी बैठकीत केल्यानंतर या कामाची पाहणी सुभाष देसाई यांनी केली. निकृष्ट काम करणाऱ्यांवर कारवाई केले जाईल, असेही ते म्हणाले.

उर्दू माध्यमांसाठी टीईटीची अट तूर्त रद्द करावी

उर्दू माध्यमांमधील अनेक शाळांमध्ये शिक्षकच नसल्याचे दिसून आले आहे. त्याची भरती प्रक्रिया ऑनलाइन  सुरू आहे. मात्र, शिक्षक पात्रता परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची संख्या उर्दू माध्यमांमध्ये नाही. त्यामुळे भरती होऊ शकलेली नाही. एखादी अट पूर्ण होत नसेल तर शिक्षकाविना शाळा ठेवता येणार नाही. मुलांच्या भवितव्यासाठी टीईटीची अट तूर्त रद्द करावी, अशी विनंती शिक्षण मंत्रालयाला करू, असेही देसाई यांनी सांगितले. खासदार इम्तियाज जलील यांनी या अनुषंगाने प्रश्न उपस्थित केला होता.