अपुऱ्या आरोग्य सुविधा असताना ३२२ रुग्णसंख्या असणाऱ्या हिंगोली जिल्ह्य़ात एकही मृत्यू झाला नाही कारण विलगीकक्षात राहण्यासाठी केलेली सक्ती. जिल्ह्य़ात कोणीही आला तरी त्यास विलगीकरण कक्षात राहणे आवश्यकच असा नियम पाळण्यात आला. तसेच एका करोनाबाधिताच्या संपर्कातील ३० व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात आणल्याने अपुऱ्या आरोग्य सुविधा असतानाही मृत्यू होऊ नये याची काळजी घेतली जात आहे. विलगीकरणासाठी कोणालाही स्वत:च्या घरात राहण्याची परवानगी दिली नाही. संस्थात्मक विलगीकरण कक्षाची पूर्ण क्षमता वापरल्याने हिंगोलीमध्ये करोना उपचार योग्य ठरत असल्याचा दावा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केला.

मार्चमध्ये जेव्हा मराठवाडय़ात करोना आल्याने कळाले तेव्हापासून विलगीकरण कक्षात आलेल्या प्रत्येकाला ठेवायचेच असा नियम ठरविला आणि त्याची अंमलबजावणी केली. पहिल्यांचा आरोग्य सुविधांचा आढावा घेतला होता तेव्हा केवळ चार कृत्रिम श्वसन यंत्रे (व्हेंटिलेटर ) उपलब्ध होते. पुढे करोना रुग्णांसाठी म्हणून कोविड उपचार केंद्र सुरू केले. दरम्यान, मुंबई आणि मालेगावहून परतलेल्या जवानांना करोना झाल्याने हिंगोली जिल्ह्य़ातील रुग्णसंख्या वाढली. करोना रुग्णाच्या संपर्कातील आलेल्या एका व्यक्तीमागे तीस जणांना कक्षात दाखल करण्यात आले. काही वेळा तर शंभर व्यक्तींपर्यंतचा शोध घेतला. त्यातील लक्षणे पाहून चाचण्या करण्यात आल्या. विलगीकरण, चाचण्या हेच सूत्र ठरवून काम केले आणि करत राहू, असा दावा रुचेश जयवंशी यांनी केला.

जे रुग्ण आले तर बाहेरगावाहून आले होते त्या  प्रत्येकाला विलगीकरण कक्षात ठेवल्याने त्याव्यतिरिक्त अन्य ठिकाणाहून रुग्णालयात येण्याची शक्यता जवळपास संपते. त्यामुळे ही पद्धत उपयोगी पडत असल्याचे दिसून आले. सध्या जिल्ह्य़ातील विविध विलगीकरण कक्षात साडेचार हजार व्यक्तींना ठेवण्यात आले आहे. स्वच्छता आणि भोजन हे विलगीकरण कक्षाचे सूत्र असल्याचे जयवंशी म्हणाले. राज्यात तीनशेहून अधिक करोना रुग्ण आढळून एकही मृत्यू न झालेला जिल्हा असे हिंगोलीचे चित्र दिसून येत आहे. पोलीस, महसूल आणि आरोग्य प्रशासनातील समन्वयामुळेही हे घडत असल्याचे सांगण्यात येत आहे.

मराठवाडय़ातील अन्य जिल्ह्य़ातील मृत्यूचे प्रमाण वाढतेच आहे. उस्मानाबाद जिल्ह्य़ात पुरेसे ऑक्सिजन न मिळाल्याने एकाचा मृत्यू झाल्याचा आरोप होता. मात्र, गंभीर करोना रुग्णांना ऑक्सिजन देण्यासाठी लागणारा दाब निर्माण करणारी यंत्रणा नसल्याने मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मृत्यूचे सर्वाधिक प्रमाण मात्र औरंगाबाद शहरात आहे. आतापर्यंत ३५५ जणांचा मृत्यू झाल्याने रक्तद्रव वापरून उपचार करण्याची पद्धतही हाती घेतली जाणार आहे. मराठवाडय़ातील सात जिल्ह्य़ांतील मृत्यूची संख्या ४९० एवढी असून मृत्यू दर ४.१ असा आहे.

जलद चाचण्या

मराठवाडय़ातील आठपैकी सात जिल्ह्य़ांत करोना रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. औरंगाबादचा आकडा दिवसेंदिवस वाढतोच आहे. त्यामुळे त्यावर उपाय शोधण्यासाठी रुग्ण शोधणेही गरजचे आहे. आता मराठवाडय़ातील बहुतांश जिल्ह्य़ात जलदगती चाचण्यांचे किट उपलब्ध झाले आहेत. ३० मिनिटात रुग्ण बाधित आहे की नाही हे या चाचणीमध्ये कळते. या चाचण्यातून मिळणारे निष्कर्ष लक्षात घेता झपाटय़ाने रुग्णसंख्या वाढेल, असा प्रशासनाला अंदाज आहे. परिणामी विविध ठिकाणी टाळेबंदी केली जात आहे. दोन मृत्यू पण

बाहेरच्या जिल्ह्य़ात सरकारी आकडेवारीत हिंगोली जिल्ह्य़ात दोन मृत्यू झाल्याची नोंद आहे. परंतु हे दोन्ही मृत्यू जिल्ह्य़ाबाहेर झाले आहेत. हे दोघेही मूळचे हिंगोली जिल्ह्य़ातील असले तरी त्यांच्यावर उपचार आणि त्यांचा मृत्यू बाहेरच्या जिल्ह्य़ांमध्ये झाल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

मागास जिल्हा असल्याने अधिक जोमाने कामाला लागलो होतो. कोणालाही संस्थात्मक विलगीकरणातून सूट दिली नाही. परिणामी सारे रुग्ण विलगीकरण कक्षातून पुढे आले. त्यामुळे लवकर उपचार होऊ शकल्याने करोना मृत्यू झाले नाहीत.

– रुचेश जयवंशी, जिल्हाधिकारी हिंगोली.