रिपाइंच्या वर्धापनदिनानिमित्त शनिवारी येथे आयोजित राजकीय महामेळाव्याकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी पाठ फिरवली, तर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनीही हजेरी लावली खरी; परंतु सुरुवातीलाच काही मिनिटे भाषण करीत अध्र्यातूनच काढता पाय घेतला! महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यांसह मेळाव्याला गर्दी जमवून खासदार रामदास आठवले यांच्या राजकीय शक्तिप्रदर्शनाकडे सत्ताधाऱ्यांनीच दुर्लक्ष केल्याने रिपाइंच्या प्रमुख नेत्यांसह कार्यकर्त्यांमधूनही व्यक्त होणारी नाराजी लपून राहिली नाही.
खासदार आठवले यांच्या नेतृत्वाखाली रिपाइंचा वर्धापनदिन महामेळावा सायंकाळी पार पडला. ग्रामविकास मंत्री मुंडे, पर्यावरण मंत्री कदम, आमदार महादेव जानकर, विनायक मेटे, संयोजक रिपाइं युवा प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. भाजप महायुतीतील घटक पक्ष असलेल्या रिपाइंने वर्धापनदिनानिमित्त महामेळाव्याला मुख्यमंत्र्यांसह भाजप प्रदेशाध्यक्ष व सर्व घटक पक्षांच्या नेत्यांना निमंत्रित केले होते. गेल्या १५ दिवसांपासून शहरात निमंत्रितांच्या नावांसह जाहिरातबाजी मोठय़ा प्रमाणात करण्यात आल्याने या मेळाव्याला राजकीय महत्त्व प्राप्त झाले होते. संयोजक पप्पू कागदे यांनी जिल्हाभर फिरून मेळाव्यास मोठी गर्दीही जमवली.
रिपाइंच्या मेळाव्यातून घटक पक्ष सत्तेत वाटा मिळावा, यासाठी कशा पद्धतीने दबाव आणतात, याकडे लक्ष लागून होते. मात्र, मेळाव्याकडे मुख्यमंत्री फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्यासह महायुतीतील घटक पक्षाचे खासदार शेट्टी यांनीही पाठ फिरवली. ग्रामविकास मंत्री मुंडे यांनी हजेरी लावून महायुतीची मोट दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी बांधली असल्यामुळे महायुतीची ताकद वाढवण्यासाठी आपण सदैव तत्पर राहू, अशी ग्वाही देऊन अवघ्या दहा मिनिटांत पुढच्या कार्यक्रमासाठी व्यासपीठ सोडले. मुंडे यांच्या पाठोपाठ शिवसेनेचे मंत्री कदम यांनीही काही मिनिटांचे भाषण करीत मागासवर्गीयांचा निधी त्यांच्याच विकासासाठी वापरला जाईल, अशी ग्वाही देत पुढच्या कार्यक्रमाचे कारण देत तेही अध्र्यातूनच निघून गेले.
दोन मंत्री निघून गेल्यानंतर मेळाव्यातला उत्साहच ओसरला. घटक पक्षांतील आमदार मेटे व जानकर यांनी आपल्या भाषणांतून सत्तेत वाटा मिळत नसल्याबद्दल अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली. आठवले यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत काव्यात्मक पद्धतीने भाष्य करीत उपस्थित भीमसनिकांना प्रोत्साहित केले. मात्र, रिपाइंने वर्धापनदिन महामेळाव्याला गर्दी खेचून जोरदार शक्तिप्रदर्शन केले असले, तरी सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनीच दुर्लक्ष केल्याने रिपाइंच्या प्रमुख नेत्यांसह कार्यकर्त्यांमधून नाराजी व्यक्त झाली.
‘आम्ही भाजपबरोबरच’!
मेळाव्यात केलेल्या भाषणात खासदार आठवले यांनी घटकपक्षांचे नेते-कार्यकर्त्यांमधील नाराजीचा सूर पकडत ‘आम्हाला काही मिळो ना मिळो, आम्ही भाजपबरोबरच राहणार’ अशी भावना व्यक्त केली.