शहरातील भीषण पाणीटंचाईला सामोरे जाण्यासाठी प्रत्येकानेच आपापल्या परीने पाणी बचतीचे उपाय करणे क्रमप्राप्त ठरले आहे. या पाश्र्वभूमीवर घरोघरी जेवणासाठी ताट-वाटीचा वापर टाळून त्याऐवजी द्रोण, पत्रावळीचा वापर केला, तर कुटुंबातील प्रत्येक सदस्य १ ते दीड लीटर पाणी वाचवू शकतो.
शहरातील सुभाष चौक मित्रमंडळ व परिवहन सभापती विक्रांत गोजमगुंडे यांनी आपल्या प्रभागातील नागरिकांना याबाबत प्रबोधन करण्यासाठी घरोघरी जाऊन द्रोण, पत्रावळींचे वाटप केले. द्रोण, पत्रावळींचा वापर केला तर पाणी वाचवता येऊ शकते. सर्वानी पाण्याचा जपून वापर करावा, हे सांगण्यासाठीच हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचे गोजमगुंडे म्हणाले. जमील मित्री, गिरीश ब्याळे, जितेंद्र ढगे, प्रशांत हलवाई, मधुसूदन बलदवा, जितेंद्र चव्हाण, महेश कौळखेरे आदी कार्यकर्त्यांनी यात सहभाग नोंदवला.