जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. परंतु निमंत्रणपत्रिकेवर दोन आमदारांचे नाव नसल्यामुळे परिषदेतील सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकाऱ्याला धारेवर धरल्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त करून नव्याने निमंत्रणपत्रिका काढली. त्यावर पदाधिकाऱ्यांचे समाधान झाले नाही. सर्वानीच कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याने निमंत्रण पत्रिकेचा वाद शिक्षण विभागाच्या अंगलट आला. अखेर अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

जिल्हा परिषदेच्या सभागृहात शनिवारी जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाच्या अनुषंगाने १०० टक्के शाळा प्रगत करण्याचे ध्येय गाठण्यासाठी जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या नियोजित कार्यक्रमानिमित्त छापलेल्या पहिल्या निमंत्रणपत्रिकेवर जिल्ह्यतील शिवसेनेचे आमदार डॉ. जयप्रकाश मुंदडा व विधान परिषद सदस्य आमदार रामराव वडकुते या दोन लोकप्रतिनिधींचे नाव नव्हते.

नव्याने निमंत्रणपत्रिका काढल्यानंतरही जिल्हा परिषद अध्यक्षा लक्ष्मीबाई यशवंते, कार्यक्रमाचे उद्घाटक खासदार राजीव सातव, आमदार वडकुते, मुटकुळे, दुरार्णी, टारफे, मुंदडा या लोकप्रतिनिधींसोबतच जिल्हाधिकारी अनिल भंडारी, जि. प.चे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी नईम कुरेशी, उपाध्यक्ष राजेश्वर पतंगे, शिक्षण सभापती अशोक हरण या सर्वच मान्यवरांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. निमंत्रणपत्रिकेवरील केवळ संभाजीराव थोरात व सोमनाथ वाळके हे दोघेच उपस्थित होते.

अखेर सकाळी १० वाजता आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी प्रमुखांची वाट पाहूनही ते येत नसल्यामुळे दुपारी १२.१५ वाजता अप्पर जिल्हाधिकारी राम गगराणी यांना निमंत्रित करून कार्यशाळेचे उद्घाटन अटोपते घेण्याची नामुष्की शिक्षण विभागावर ओढावली. उद्घाटनपर भाषणातून गगराणी यांनी आता खासगी शाळेतील शिक्षणापेक्षाही जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षणाचा दर्जा सुधारत असल्यामुळे जि.प.च्या शाळेकडे विद्यार्थ्यांची ओढ निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.