औरंगाबाद, जालना आणि हिंगोलीत सेनेच्या तडजोडीला यश

जिल्हा परिषद निवडणुकीत मराठवाडय़ात सर्वात कमी म्हणजे केवळ ८६ सदस्य निवडून आलेल्या शिवसेनेने तडजोडीच्या राजकारणात औरंगाबाद, हिंगोली आणि जालना या तीन जिल्हा परिषदांवर सत्ता मिळवली. भाजपला दूर ठेवायचे, हे एकमेव सूत्र ठरवून औरंगाबादमध्ये सेनेने काँग्रेसशी युती केली. हिंगोलीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि सेना आणि एकत्र आल्या. हिंगोली जि.प.च्या अध्यक्षपदी शिवराणी नरवाडे विजयी झाल्या. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या जिल्ह्य़ातही शिवसेनेचे मंत्री अर्जुन खोतकर यांचे बंधू विजयी झाले. भाजपचे उमेदवार अवधूत खडके यांना पराभव पत्करावा लागला. बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसवर कुरघोडी करून भाजपने सत्ता मिळविली, तर लातूरमध्ये भाजपचे मिलिंद लातुरे बिनविरोध निवडून आले. सत्तेसाठीच्या खिचडीत राष्ट्रवादी काँग्रेसने अन्य सर्व पक्षांबरोबर युती आणि आघाडी केल्याचे आज अध्यक्ष निवडीनंतर स्पष्ट झाले.

औरंगाबाद पंचायत समितीमध्ये काँग्रेसबरोबर युती केल्यानंतर तेच सूत्र जिल्हा परिषदेत कायम ठेवत शिवसेनेने काँग्रेसबरोबर हातमिळवणी केली. काँग्रेस आणि शिवसेनेच्या ३४ मतांच्या आधारे देवयानी कृष्णा डोणगावकर यांनी भाजपाच्या अनुराधा चव्हाण यांना पराभूत केले. त्यांना २८ मते मिळाली. औरंगाबादमधील हे सूत्र अन्य सर्व जिल्ह्य़ात पद्धतशीरपणे वापरण्यात आले. यात जालना आणि हिंगोली जिल्ह्य़ाचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना बाजूला ठेवत शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी आघाडी केली. पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचे बंधू जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश टोपे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश जेथलिया, माजी आमदार कैलाश गोरंटय़ाल आणि दोन अपक्ष एकत्र आल्यामुळे भाजपाच्या ताब्यात जालना जिल्हा परिषद येऊ शकली नाही.

हिंगोलीमध्येही राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना हे पक्ष एकत्रित आले. शिवसेनेकडे १५, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी २४, भाजपा १०, तर ३ अपक्ष असे हिंगोलीतील पक्ष बलाबल होते. उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व मिळवले. मात्र, सत्ता मिळविण्यासाठी आवश्यक दोन जागा कमी असल्याने तेथे भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसला मदत केली. परभणीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपाने मदत केली. शिवसेनेच्या भूमिकेचा मात्र निकालानंतरही उलगडा होऊ शकला नाही. नांदेडमध्ये काँग्रेसला यश मिळणार, हे जवळपास नक्की होते. राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसला साथ दिल्यामुळे ७५ वर्षांच्या शांताबाई जवळगावकर यांची अध्यक्षपदी निवड झाली.

जिल्हा परिषदेत बहुमताच्या जवळ असलेल्या राष्ट्रवादीला धक्का देत जिल्हा परिषदेत भाजपाने झेंडा रोवला. शिवसेना, शिवसंग्राम, राष्ट्रवादीतील सुरेश धस गट आणि काँग्रेसच्या एका सदस्याची मोट बांधून मुंडे यांनी सत्ता खेचून घेण्यात यश

मिळवले. अध्यक्षपदी भाजपाच्या सविता विजय गोल्हार तर उपाध्यक्षपदी शिवसंग्रामच्या जयश्री राजेंद्र मस्के यांना प्रत्येकी ३४ तर राष्ट्रवादीच्या मंगला सोळंके आणि शिवकन्या सिरसाट यांना प्रत्येकी २५ मते मिळाली. आमदार जयदत्त क्षीरसागर समर्थक एक सदस्य गरहजर राहिला. भाजपाचे केवळ २० सदस्य असताना मित्र पक्षांना सोबत घेऊन ३४ संख्याबळ करत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना धक्का दिला.