News Flash

जिल्हा रुग्णालय टँकरवर, स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर

दुष्काळामुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईचा फटका शेतीसह आरोग्य यंत्रणेलाही बसू लागला आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयाबरोबरच स्त्री रुग्णालयाचीही मदार सध्या टँकरच्या पाण्यावर आहे.

दुष्काळामुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईचा फटका शेतीसह आरोग्य यंत्रणेलाही बसू लागला आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयाबरोबरच स्त्री रुग्णालयाचीही मदार सध्या टँकरच्या पाण्यावर आहे. प्रसूती कक्षात पाणीटंचाईमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांचा गुंता सर्वाधिक आहे. प्रसूतीसाठी सर्वात जास्त गर्दी असलेल्या शासकीय स्त्री रुग्णालयाला पालिकेकडून अजून नळजोडणीही मिळू शकली नाही. टंचाईची तीव्रता, रुग्णांची वाढती संख्या आणि पाण्याअभावी निर्माण झालेला अस्वच्छतेचा प्रश्न अशा अडथळ्यांच्या शर्यतीतून आरोग्य यंत्रणा मार्ग काढण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे.
जिल्हा रुग्णालयास दररोज १५ हजार लिटर पाण्याची गरज आहे. प्रत्यक्षात मात्र दररोज केवळ ७ हजार लिटर पाणी उपलब्ध होत आहे. या भीषण पाणीटंचाईचा फटका सर्वात जास्त प्रसूती कक्षाला सहन करावा लागत आहे. दुष्काळाच्या तीव्रतेमुळे शेतीबरोबरच आरोग्य यंत्रणाही घायकुतीला आली आहे. अपुऱ्या पाणीपुरवठय़ामुळे संकटांची नवीन मालिकाच जिल्हा शासकीय रुग्णालयात सुरू झाली आहे. रुग्णालयाची स्वच्छता व दररोज प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांना पाणीसमस्येमुळे खासगी दवाखान्यात पाठविण्याची वेळ रुग्णालय यंत्रणेवर येऊन ठेपली आहे. दुसरीकडे नगरपालिकेला उजनीच्या पाण्यासाठी अर्ज देऊनही अजून नळजोडणी मिळत नसल्याने स्त्री रुग्णालयाची मदार खासगी टँकरवरच सुरू आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालय व महिलांसाठी वेगळे असलेले शासकीय स्त्री रुग्णालय या दोन्ही रुग्णांलयांतील कूपनलिका आटल्या आहेत. पालिकेकडून होणारा पाणीपुरवठाही अपुरा पडत आहे. स्त्री रुग्णालयातील दोन कूपनलिका पूर्णत: आटल्या आहेत. त्यामुळे रुग्णालयातील स्वच्छता राखण्यात प्रशासनाला कमालीच्या अडचणी येत आहेत. पाणी समस्येमुळे शल्यगृहातील कपडय़ांची, शस्त्रक्रिया साहित्याची तसेच शल्यगृहाची स्वच्छता राखता येत नाही. अनेक वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना रुग्णालयात येताना घरूनच पाणी आणावे लागत आहे. मात्र, रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांचे पाण्याअभावी हाल होत आहेत.
जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानी पाण्याची काटकसर करून जिल्हा रुग्णालयाला पुरवठा करण्याची धडपड रुग्णालय प्रशासनाकडून सुरू आहे. नगरपालिकेकडून नळाद्वारे मिळणारे पाणी एका टाकीत सोडले जाते. त्यानंतर हे पाणी प्राधान्याने जिल्हा रुग्णालयासाठी आणि उर्वरित पाणी कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानी नळाद्वारे पुरविले जात आहे. अपुरा पाणीपुरवठा होत असल्यामुळे कर्मचाऱ्यांची पाण्यासाठी ओरड सुरू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2016 1:30 am

Web Title: district hospital on the tanker cleanliness question
टॅग : Osmanabad,Tanker
Next Stories
1 केंद्राच्या तिजोरीत मराठवाडय़ातून १ हजार ९४६ कोटी
2 दगडाने ठेचून वृद्धाचा खून
3 पाणी पहाऱ्यात..
Just Now!
X