मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता
औरंगाबाद : औरंगाबाद महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकाने घरातच गर्भलिंग चाचणी करून गर्भपात करताना मंगळवारी सकाळी एका डॉक्टरला रंगेहाथ पकडले. या प्रकरणी गर्भलिंग चिकित्सा प्रतिबंधकच्या कार्यक्रम अधिकारी अमरज्योती शिंदे यांच्या तक्रारीवरून उस्मानपुरा पोलीस ठाण्यात डॉ. सूरज सूर्यकांत राणा (वय ४५) याच्याविरुद्ध सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला.
या कारवाईसंदर्भात मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले की शहरातील उस्मानपुरा भागातील पीरबाजार परिसरात असलेल्या एका सदनिकेच्या ठिकाणी बेकायदा पद्धतीने गर्भलिंग चाचणी व गर्भपात होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यासाठी १५ हजार रुपये शुल्क डॉ. राणा घ्यायचा. राणा हा होमिओपॅथीचा डॉक्टर आहे. त्याच्याकडे एका महिलेला तेथे तपासणीसाठी पाठवले तेव्हा तेथे आधीच सिल्लोड येथील एका महिलेची गर्भिलग चाचणी सुरू होती. याच दरम्यान, पथकाने छापा टाकला. सूरज राणा याचे बिंग फोडले.
या कारवाईत डॉ. राणा याच्या हाताखाली काम करणारा कर्मचारी आणि रिक्षाचालक असलेला एजंट या तिघांनाही उस्मानपुरा पोलिसांनी ताब्यात घेतले.
या कारवाईत मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर, अमरज्योती शिंदे, सविता उबाळे, प्रवीण रांजणगावकर, अशोक कांबळे, शासनाच्या विधी सल्लागार आणि पीसीपीएनडीटी सेलच्या अॅड. रश्मी शिंदे, समाजसेविका रश्मी बोरीकर सहभागी होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 24, 2019 11:25 pm