|| सुहास सरदेशमुख

१०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकांचे व्यवस्थापन खिळखिळे

औरंगाबाद : वाहनचालक आणि डॉक्टर यांचे व्यवसाय वेगवेगळे. त्यातील कोणाचे वेतन अधिक असेल? कोणीही डॉक्टर असेच उत्तर देईल. पण राज्यातील १०८ क्रमांकाने सुरू केलेल्या रुग्णवाहिकांवरील कर्मचाऱ्यांच्याबाबतीत हे म्हणणे खोटे ठरेल. कारण रुग्णवाहिकेच्या वाहनचालकाचे वेतन आहे १२ हजार आणि डॉक्टरांचे वेतन कुठे ११ हजार, तर कुठे १४ हजार.

अलीकडेच रुग्णवाहिकांवरील बहुतांश वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्रात कंत्राटी पद्धतीच्या भरतीत अधिक पगाराची नोकरी मिळत असल्याने तिकडे रुजू झाले आणि राज्यातील ९३७ रुग्णवाहिकांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता भासू लागली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही या वृत्तास दुजोरा दिला. यातील तफावत दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे ते ‘लोकसत्ता’शी बोलताना म्हणाले. आरोग्य  क्षेत्रातील तफावतींची जंत्रीच अलीकडे आदिवासी भागात साने गुरुजी रुग्णालय स्थापन करणाऱ्या डॉ. अशोक बेलखोडे यांनी एका जाहीर पत्रान्वये आरोग्यमंत्र्यांकडे सादर केली आहे.

किनवट तालुक्यातील बोकुंदा भागात रुग्णवाहिकेवर वर्षभरापूर्वी नोकरी करणारे डॉ. व्ही. जी. कावळे म्हणाले, ‘११ ते १२ हजार रुपये कसेबसे वेतन मिळायचे. आठ तासांची नोकरी होती. अतितत्परतेने रुग्णांवर उपचार करण्याच्या अत्याधुनिक रुग्णवाहिकेत काम करणे अपरिहार्य होते. १९८६ साली बी.ए.एम.एस. शिक्षण पूर्ण केल्यानंतर काही दिवस रुग्णसेवा केली. मात्र, नंतर नोकरी पत्करली. पुढे जेवढे अधिक काम तेवढा पगार असे सूत्र स्वीकारले गेले. त्यात किती वेळ काम करणार म्हणून ती नोकरी सोडली. पण जेव्हा आम्हाला ११ हजार रुपये मानधन मिळत होते तेव्हा चालकाला मात्र १२ हजार रुपये वेतन मिळत होते.’

अशीच अवस्था औरंगाबाद शहरातील डॉ. स्वप्निल जोशी यांची आहे. ते म्हणाले, ‘एन-८ भागात सध्या काम करत आहे. मला १४ हजार रुपये वेतन मिळते. चालकाला १२ हजार रुपये वेतन मिळते. त्याच्या कामात आणि माझ्या कामात फक्त दोन हजार रुपयांचा फरक आहे. वेतन वेळेवर दिले जात नाही.’

वेतनातील हा फरक रुग्णवाहिकेचा कारभार पाहणाऱ्या एका कंपनीला त्रयस्थ संस्था म्हणून देण्यात आला आहे. त्या संस्थेतील गैरकारभाराविषयी काही तक्रारीही करण्यात आल्या होत्या. पण त्याची कोणी दखल घेतली नाही. आता नव्याने हा विरोधाभास पुढे आणला जात आहे.

डॉ. बेलखोडे यांचे विरोधाभासावर बोट

बहुतांश रुग्णवाहिका आता खिळखिळ्या झाल्या आहेत. या सेवेत अनेक विरोधाभास आहेत. ते दाखवणारे पत्र अलीकडेच आरोग्यमंत्र्यांना पाठविल्याचे डॉ. अशोक बेलखोडे यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘प्रसूतीनंतर कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याला ७५ रुपये मिळतात आणि प्रसूतीसाठी पाठपुरावा करणाऱ्या आशा कार्यकर्तीला १५० रुपये मिळतात. आरोग्य विभागातील मनुष्यबळ मुंबई, बृहन्मुंबई, पुणे, नाशिक या चार जिल्ह्य़ांमध्येच आहेत. उर्वरित महाराष्ट्रात केवळ २५ टक्के तज्ज्ञ मनुष्यबळ विखुरले आहे. आरोग्य व्यवस्था चांगली कशी होईल? ‘

डॉक्टरांची कमतरता : १०८ हा दूरध्वनी क्रमांक फिरविल्यास दोन प्रकारच्या रुग्णवाहिका उपलब्ध असतात. त्यांतील सुविधा आणि औषधे योग्य आहेत. मात्र, कर्मचाऱ्यांच्या वेतनातील फरक इतका कमी आहे की वैद्यकीय अधिकारी वैतागले आहेत. अनेक डॉक्टरांना चरितार्थ चालवण्यासाठी काम करावे लागते. बीएएमएस शिक्षण घेणारे बहुतांश डॉक्टर या कामाला वैतागले आहेत. इतरत्र या डॉक्टरांना २५ ते ३० हजार रुपये वेतन कंत्राटी कर्मचारी म्हणून दिले जात असल्यामुळे रुग्णवाहिकांमध्ये डॉक्टरांची कमतरता आहे.