औरंगाबाद : शासकीय कर्करोग रुग्णालयात कार्यरत एका डॉक्टर तरुणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी कटकट गेट परिसरातील टाइम्स कॉलनीत उघडकीस आली. शादाब शिरीन मोहम्मद आरिफ (वय २८), असे आत्महत्या केलेल्या डॉक्टर तरुणीचे नाव आहे. डॉ. शादाब हिने वैद्यकीयचे पदव्युत्तरचे (एमडी) शिक्षण पूर्ण करून शासकीय कर्करोग रुग्णालयात रुग्णसेवा सुरू केली होती. डॉ. शादाब हिचे येत्या १३ मार्च रोजी लग्न नियोजित केले होते. मात्र तत्पूर्वीच तिने आत्महत्या केली. या प्रकरणाची नोंद जिन्सी पोलीस ठाण्यात करण्यात आली.

औरंगाबाद वैद्यकीय शासकीय महाविद्यालय व रुग्णालयाशी संबंधित डॉक्टरने आत्महत्या करण्याची ही मागील दोन महिन्यांतील दुसरी घटना आहे. यापूर्वी डॉ. शेषाद्री गौडा या तरुण डॉक्टरने विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली होती. मूळचे कर्नाटकातील असलेल्या डॉ. शेषाद्री यांनी मानसिक आजाराच्या संशयावरून आत्महत्या केली होती. दोन वर्षांपूर्वी वैजापूरमध्ये कार्यरत पण मूळचे विदर्भातील असलेल्याही एका डॉक्टरने आत्महत्या केल्याची घटना घडलेली आहे.