औरंगाबाद : कृत्रिम पावसासाठी आवश्यक असलेले सी-डॉप्लर रडार दोन दिवसांपूर्वी औरंगाबादेत दाखल झाले. रविवारी (दि. ४) विभागीय आयुक्तालयाच्या इमारतीवर रडार बसविले असून पुढील दोन दिवसांत ते कार्यान्वित होईल, असे सांगण्यात येते. कृत्रिम पावसासाठी बसविलेल्या यंत्रणेची बुधवारी तपासणी करण्यासाठी एस. जे. पिल्लई आणि  ज्ञानेंद्र वर्मा हे दोन शास्त्रज्ञ औरंगाबाद येथे येणार आहेत.

प्रत्यक्षात कृत्रिम पावसाचा प्रयोग औरंगाबादेतून केला जाईल, अशी माहिती अप्पर विभागीय आयुक्त विजयकुमार फड यांनी दिली.

दोन महिन्यांपूर्वी अखेरीस २३ मे रोजी मंत्रिमंडळाच्या बठकीत मराठवाडय़ासह अवर्षणग्रस्त भागात कृत्रिम पाऊस पाडण्याचा निर्णय घेतला होता.

१० जून रोजी ३० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरीही दिली. मात्र, दोन महिने लोटले तरी कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी गरजेचे असलेले सी-डॉप्लर रडार व इतर साहित्य आलेले नव्हते.

दुष्काळग्रस्त मराठवाडय़ात कृत्रिम पाऊस पाडणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. २२ जुलै रोजी विभागीय आयुक्तालयात सी-डॉप्लर रडार बसवण्यासाठी स्टँड आले आणि औरंगाबादेतून कृत्रिम पावसाचा प्रयोग होणारच, हे स्पष्ट झाले.

मात्र, यानंतरही रडार येण्यास दहा दिवस लागले. अखेर शुक्रवारी (दि.२) आयुक्तालयात रडार आले. गेल्या दोन दिवसांपासून ते बसवण्याचे काम सुरू आहे.

कृत्रिम पावसाच्या प्रयोगाचे कंत्राट ख्याती वेदर मॉडिफिकेशन कंपनीला देण्यात आलेले आहे. कंपनीने दोन दिवसांपूर्वी विदेशातून आणलेले सी-डॉप्लर रडार आयुक्तालयावर बसवण्याचे काम केले आहे. हे रडार पाऊस पडण्याची क्षमता असलेले ढग हेरतील, त्यानुसार विमानाच्या साहाय्याने त्यामध्ये रसायनांची फवारणी केली जाईल.

दोन दिवसांत रडार कार्यान्वित केले जाणार असून याच आठवडय़ात कृत्रिम पावसाचा पहिला प्रयोग केला जाणार असल्याचे अपर आयुक्त फड यांनी सांगितले.