मराठवाडय़ातील भीषण वास्तव; बालविवाहांचे प्रमाणही तीस टक्क्य़ांवर

बीड जिल्हय़ातील शिरूर तालुक्यात व्यवसायाने शिक्षक असणाऱ्याचे नुकतेच लग्न झाले. हुंडा किती दिला असेल?- १० लाख रुपये. मराठवाडय़ातील ऊसतोड मजुरीला जाणारे पालकही हुंडय़ासाठी तीन-तीन लाख रुपये देत आहेत. त्यासाठी जमिनी गहाण ठेवत आहेत. ऊसतोडीसाठी घेतलेली उचल रक्कम केवळ लग्नासाठी वापरली जात आहे. एक सूत्र सार्वत्रिक विकसित होत आहे, ते म्हणजे वयाने जेवढी मुलगी मोठी, तेवढा हुंडा जास्त. मराठवाडय़ात होणारे विवाह आणि घेतला जाणारा हुंडा याबाबतची ही निरीक्षणे आहेत ‘लेक लाडकी अभियानातील’ कार्यकर्त्यांची.

अशाच हुंडय़ाच्या कुप्रथेमुळे लातूर तालुक्यातील शीतल व्यंकट वायाळ हिने तिची जीवनयात्रा संपवली. मराठवाडय़ात हुंडय़ाचा प्रश्न गंभीर असल्याची चर्चा बालहक्क संरक्षण कायद्याची चर्चा करणाऱ्या न्यायाधीशांसमवेतही झाली आहे. हुंडा आणि बालविवाह या दोन कारणांमुळे मराठवाडय़ातील पती-पत्नीमधील वयाचे अंतर १० ते १२ वर्षांपर्यंत वाढलेले आहे.

शिरूर तालुक्यामध्ये मुलींचा जन्मदर राज्यात कमी असल्यामुळे येथील बालविवाहाचा प्रश्न हाती घेऊन काम करणाऱ्या ‘लेक लाडकी अभियाना’च्या वर्षां देशपांडे म्हणाल्या, ‘तीन वर्षांपासून या भागात काम करत आहोत. पूर्वी हा दर पाच लाखांपर्यंत असायचा. विनाअनुदानित शाळेवर शिक्षक म्हणून नोकरी मिळावी म्हणून संस्थाचालकांना पैसे देण्यासाठी हुंडा घेणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. पूर्वी हा दर ५ लाखांचा होता. आता तो १० लाखांपर्यंत गेला आहे.’ केज, पाथर्डी, बीड या ऊसतोड मजुरांचे प्राबल्य असणाऱ्या भागातही हुंडय़ाचा किमान दर तीन लाख रुपयांवर आहे. केवळ हुंडाच नाही तर रुखवतात अगदी कुकरपासून  ते दुचाकीपासून ते वॉशिंग मशीनपर्यंत सगळय़ा वस्तू दिल्या जाव्यात, असे सांगितले जाते. मुलींची संख्या कमी असल्यामुळे लग्न जमवून देणाऱ्यांचे मोठे जाळे आहे. हुंडय़ातली काही रक्कम ते कमिशन घेतात.

याबाबत संयुक्त राष्ट्रांच्या लोकसंख्या निधीविषयक काम करणाऱ्या संस्थेचे ज्ञानेश रेणगुंठीवार म्हणाले, ‘‘विवाहेच्छुक तरुणांच्या पत्नीविषयीच्या मराठवाडय़ातल्या तरुणांच्या कल्पनाही अचाट आहेत. ‘जेवढी मुलगी गोरी, तेवढा हुंडा कमी.’ असे स्पष्ट मत कॅमेऱ्यासमोर नोंदवणारे तरुण आहेत.  त्याचा परिणाम म्हणून मराठवाडय़ात बालविवाहाचे प्रमाण ३० टक्क्यांच्या घरात आहे.

कर्जामुळे विवाह रखडल्याने शेतकरीकन्येची आत्महत्या

लातूर : लग्नखर्चाचे वडिलांवरील ओझे कमी करण्यासाठी आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून लातूर तालुक्यातील भिसेवाघोली येथील २१ वर्षीय शीतल व्यंकट वायाळ या मुलीने शुक्रवारी जीवनयात्रा संपविली. नापिकी व कर्जबाजारीपणात कुटुंब अडकल्यामुळे सलग पाच वर्षांपासून तिचे लग्न रखडले होते.  व्यंकट वायाळ यांच्याकडे पाच एकर जमीन आहे. पत्नी, दोन मुले आणि तीन मुली असा त्यांचा परिवार आहे. पाच एकरांपकी दीड एकरात ऊस लावलेला, मात्र पाण्याअभावी तो करपून गेला. तीनपकी दोन मुलींचे विवाह साखरपुडय़ाच्या वेळीच उरकले.  शीतलच्या विवाहाची चिंता होती. दहावीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर आíथक अडचणीमुळे तिचे शिक्षणही सुटले. शनिवारी शेतावर काम करत असताना ती पाणी पिऊन येते, असे सांगून गेली. फार वेळ झाला तरी न आल्यामुळे आई, वडील व शेजारी तिच्या शोधार्थ निघाले. विहिरीतील पाण्यावर तिची चप्पल तरंगत असल्याचे दिसली.  त्यानंतर विहिरीत मृतदेह आढळला.

ते अखेरचे पत्र..

मी शीतल व्यंकट वायाळ चिठ्ठी अशी लिहिते की, माझे वडील मराठा कुणबी कुटुंबात जन्मले असल्यामुळे त्यांच्या शेतात सलग पाच वर्षांपासूनच्या नापिकीमुळे आमच्या कुटुंबांची परिस्थिती अत्यंत हलाखीची व नाजूक असून माझ्या दोन बहिणींचे लग्नही ‘गेटकेन’ (साखरपुडय़ातच लग्न करणे) करण्यात आले; परंतु माझे लग्न गेटकेन करण्यासाठी दोन वर्षांपासून बापाची दरिद्री संपत नव्हती. कुठल्याही बँकेचे किंवा सावकाराचे कर्ज माझ्या बापाला न मिळाल्यामुळे माझे लग्न दोन वर्षांपासून रखडले होते. तरी मी माझे माझ्या बापावरील वजन कमी करण्यासाठी व मराठा समाजातील रूढी-परंपरा, देवाणघेवाण कमी करण्यासाठी स्वखुशीने आत्महत्या करीत आहे. तरी मला व माझ्या कुटुंबाला समाजाने कुठलाही दोष देऊ नये.  – शीतल वायाळ