News Flash

भीमसागर उसळला

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीचा उत्साह बुधवारी मध्यरात्रीपासून सुरू झाला आणि गुरुवारी दिवसभर जयभीमच्या घोषणांनी शहर दणाणून गेले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीचा उत्साह बुधवारी मध्यरात्रीपासून सुरू झाला आणि गुरुवारी दिवसभर जयभीमच्या घोषणांनी शहर दणाणून गेले. उन्हाची तीव्रता अधिक असतानाही दिवसभर प्रत्येक रस्त्यावरून तरुणांनी काढलेल्या दुचाकी रॅली, निळे झेंडे हाती घेऊन उतरलेली तरुणाई एका बाजूला आणि पुस्तकांच्या संगतीने बाबासाहेब समजून घेणाऱ्या अनेकांनी विविध ठिकाणी वैचारिक कार्यक्रमाचे गुरुवारी आयोजन केले होते.
शहरातील नागसेनवन परिसर अक्षरश: फुलून गेला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी नेत्यांनी गर्दी केली होती. भडकल गेट येथील पुतळ्याभोवती रोषणाई केली होती. सकाळी येथे अभिवादनासाठी रीघ लागली होती. महापौर त्र्यंबक तुपे, खासदार चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे यांनी अभिवादन केले. दुपारी शहरातील क्रांती चौकापासून ते पठण गेटपर्यंत सर्वत्र अभिवादनासाठी स्टेज उभारण्यात आले. सायंकाळी नागसेनवन परिसरात भीमसागर उसळला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ क्रीडा विभागातर्फे समता दौड, तर विद्यार्थी कल्याण केंद्रातर्फे बाबासाहेबांच्या तैलचित्राची मिरवणूक काढण्यात आली. विद्यापीठातील वनस्पती उद्यानापासून निघालेल्या समता दौडमध्ये कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे, नलिनी चोपडे, संयोजक डॉ. प्रदीप दुबे यांच्यासह अधिकारी, विद्यार्थी मोठय़ा संख्येने सहभागी झाले. विद्यापीठ गेट ते नाटय़गृह दरम्यान तैलचित्राची मिरवणूक काढण्यात आली. निळे फेटे घालून जयघोषात ही मिरवणूक निघाली. विद्यापीठातर्फे तयार करण्यात आलेल्या सात विविध ग्रंथांचे प्रकाशन गुरुवारी आयोजित कार्यक्रमात करण्यात आले. डॉ. वि. ल. धारूरकर, ज. वि. पवार, डॉ. उत्तम अंभोरे, संजय भमरे, डॉ. राजेश रगडे, डॉ. विनोद जोगदंड, डॉ. अरविंद धाबे या पुस्तकांचे संपादक आहेत.

डॉ. बाबासाहेबांना
परभणीत अभिवादन
वार्ताहर, परभणी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती जिल्हाभरात उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यास हजारो आंबेडकरप्रेमी जनता एकत्र आली होती. या वेळी डॉ. आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आली.
सकाळपासूनच शहरातील विविध भागांतून महिला-पुरुष मोठय़ा प्रमाणावर अभिवादनासाठी पुतळ्याजवळ जमले होते. मानवंदनेनंतर अभिवादनास महिला-पुरुषांच्या रांगा लागल्या. यात लोकप्रतिनिधींचाही सहभाग होता. भाजपच्या वतीने जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांनी ५ हजार मोतीचूर लाडूचे वाटप करण्यात आले. महापौर संगीता वडकर, खासदार संजय जाधव, आमदार डॉ. राहुल पाटील, जि. प. अध्यक्ष राजेश विटेकर, माजी खासदार गणेशराव दुधगावकर, तुकाराम रेंगे पाटील, माजी मंत्री फौजिया खान, गौतम भालेराव, सिद्धार्थ हत्तीअंबीरे, भीमराव हत्तीअंबीरे, विजय वाकोडे, अॅड. प्रताप बांगर आदींचा सहभाग होता. शहरात विविध संस्था व संघटनांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महापालिकेच्या वतीने संविधान फलकाचे भूमिपूजन करण्यात आले. महापौर वडकर यांच्यासह आयुक्त राहुल रेखावार, महापालिकेचे नगरसेवक या वेळी उपस्थित होते.
जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. अन्नदानाचेही कार्यक्रम विविध संस्थांनी आयोजित केले. येथील सर्व धर्मीय फुले-शाहू-आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने विचारवेधक देखाव्यातून संविधानाने प्रस्थापित केलेले समतेचे मूल्य हे बुद्ध-फुले-शाहूंच्या विचार प्रणालीतून स्वीकारले असल्याचे सादर केले. बी. जी. केळकर यांच्या संकल्पनेतून हा देखावा साकारला.
सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालयातर्फे सामाजिक न्यायभवन परिसरात १२५ रोपांचे रोपण करून सामाजिक समता सप्ताहाचा समारोप करण्यात आला.
हिंगोलीत वाद्यांच्या
निनादात मिरवणूक
वार्ताहर, िहगोली
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५वी जयंती जिल्ह्यात मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी अभिवादन झाल्यानंतर शहरात प्रत्येक प्रभागातून डॉ. आंबेडकर यांच्या नावाचा जयघोष करीत मिरवणुका निघाल्या.
रामलीला मदानावर डॉ. आंबेडकर हॉल येथे आल्यानंतर ढोलताशांच्या निनादात गांधी चौकात एकत्र मिरवणूक दाखल झाली. बाबासाहेबांच्या नावाचा जयघोष करीत मिरवणूक प्रमुख मार्गावरून रात्रीपर्यंत मार्गक्रमणा करीत होती. मध्यरात्रीपर्यंत मिरवणूक सुरू राहील, असे चित्र होते. मिरवणुकीत चोख पोलीस बंदोबस्त होता. नगरपालिकेने ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती.
जिल्हाधिकारी तुकाराम कासार यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळय़ास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. भन्ते व महिला मंडळाच्या उपस्थितीत सामुदायिक पंचशील त्रिशरण झाले.
वसमत, औंढा नागनाथ, कळमनुरी, सेनगाव, चौंढी बहिरोबा, गोरेगाव, नरसी नामदेव, आंबा चोंडी, आखाडा बाळापूर, जवळाबाजार आदी ठिकाणी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. िहगोलीत सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे दसरा मदानावर डॉ. आंबेडकर हॉल येथे आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्या उपस्थितीत पंचशील झेंडावंदन कार्यक्रम झाला. गांधी चौकात संविधान कॉर्नरचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्या हस्ते झाले. या वेळी न.प.चे उपाध्यक्ष जगजितराज खुराणा, दिवाकर माने, अनिल नेनवाणी आदींची उपस्थिती होती.
‘एकच साहेब’, ‘जयभीम’
नाऱ्याने बीड शहर दुमदुमले
वार्ताहर, बीड
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त आंबेडकर यांच्या पुतळय़ास मान्यवरांसह लोकसमुदायाने मोठय़ा उत्साहात अभिवादन केले.
शहरात डॉ. आंबेडकर पुतळय़ाला अभिवादनासाठी हजारो अनुयायी सकाळपासूनच उपस्थित होते. निळे फेटे परिधान करून कार्यकर्त्यांनी अभिवादन केले. खासदार डॉ. प्रीतम मुंडे, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, रिपाइं युवा प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे, जि.प. सभापती संदीप क्षीरसागर, भाजप जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी अभिवादन केले. जयंतीनिमित्त शहरातून रॅली काढण्यात आली. यात पुरुष, महिला, मुले, मुली मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. ‘एकच साहेब बाबासाहेब’ आणि ‘जयभीम’च्या नाऱ्याने शहर दुमदुमून गेले होते. परळीत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत अभिवादन सभा झाली. नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांच्यासह मोठय़ा संख्येने जनसागर या वेळी उपस्थित होता.
लातुरात निळा जनसागर उसळला
वार्ताहर, लातूर
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती उत्सवानिमित्ताने शहरातील आंबेडकर पार्क येथील बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळय़ास पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यासाठी जनसागर उसळला.
पहाटेपासूनच मोठय़ा संख्येने कार्यकर्त्यांची गर्दी जमू लागली होती. खासदार डॉ. सुनील गायकवाड, आमदार अमित देशमुख व त्र्यंबक भिसे, जयंतीचे अध्यक्ष पृथ्वीराज शिरसाठ, महापौर अख्तर शेख आदींनी बाबासाहेबांना अभिवादन केले. सकाळी अकराच्या सुमारास ध्वजवंदना व नंतर सार्वजनिक बुद्धवंदना करण्यात आली. कडक उन्हातही आंबेडकरप्रेमी मोठय़ा उत्साहात उपस्थित होते. माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, चंद्रकांत चिकटे, मोहन माने, प्रा. अनंत लांडगे, बसवंतअप्पा उबाळे, अशोक कांबळे, रघुनाथ बनसोडे, शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत, अॅड. बळवंत जाधव, भाजप शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी, गुरुनाथ मगे, शैलेश गोजमगुंडे, शेकापचे अॅड. उदय गवारे, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे, संजय बनसोडे, शैलेश स्वामी आदींची उपस्थिती होती. शहरातील मुख्य रस्त्यावर वाहतुकीत अडचण निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
त्रिपुरा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात संस्थेचे अध्यक्ष उमाकांत होनराव, प्राचार्या सुलक्षणा केवलराम यांच्या उपस्थितीत आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. बीएसएनएलच्या वतीने साहित्य संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांचे व्याख्यान आयोजित केले होते. महावितरण लातूर परिमंडळात शर्मिष्ठा भोसले यांचे व्याख्यान झाले. मुख्य अभियंता अनिल भोसले अध्यक्षस्थानी होते. अधीक्षक अभियंता बी. ए. वासनिक, डी. डी. हमंद, कार्यकारी अभियंता सुरेश फेरे, रवींद्र कोलप, उत्सव समितीचे अध्यक्ष शीलरत्न सूर्यवंशी उपस्थित होते.
गोदावरीदेवी कन्या विद्यालयात मुख्याध्यापिका उषा िशदे यांच्या उपस्थितीत जयंती साजरी करण्यात आली. िशदे यांनी ‘आंबेडकरांच्या वाचनाचा व्यासंग’ या विषयावर विद्याíथनींना मार्गदर्शन केले. श्रीकिशन सोमाणी विद्यालयात मुख्याध्यापक सुभाष मिश्रा यांनी ‘संविधान निर्मितीतील बाबासाहेबांचे योगदान’ या विषयावर आपली भूमिका मांडली.
केशवराज विद्यालयात खासदार डॉ. सुनील गायकवाड प्रमुख म्हणून उपस्थित होते. जिल्हा वकील मंडळाचे अध्यक्ष अॅड. अण्णाराव पाटील, डॉ. अशोकराव पाटील, एस. ओ. एस बालग्रामच्या संचालिका वैष्णवी जोगळेकर, अभाविपचे प्रदेश सहमंत्री अभिजित पाटील, संस्थेचे कार्यवाह नितीन शेटे आदी उपस्थित होते. बाबासाहेबांचा शिक्षणाचा मंत्र स्वीकारून शैक्षणिक वाटचाल करण्याचे आवाहन खासदार गायकवाड यांनी केले. श्रीमती सुशीलादेवी देशमुख महाविद्यालयात प्राचार्य डॉ. बाबासाहेब गोरे यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. राजकुमार कांबळे, वेदप्रकाश लवाडे, आदी उपस्थित होते.

‘बाबासाहेबांचे जीवन म्हणजे देश घडविणारे महाकाव्य’
प्रतिनिधी, औरंगाबाद
कोणत्याही देशाच्या इतिहासात लाटेवर स्वार होणारी व लाट निर्माण करणारी अशी दोन प्रकारची माणसे असतात. देशात तत्कालीन समाजव्यवस्थेच्या विरोधातील लाट थोपवून परिवर्तनाचे युग घडविणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संपूर्ण जीवन हे देश घडविणारे महाकाव्य आहे, असे प्रतिपादन माजी कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे यांनी केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षांचा सांगता समारंभ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात गुरुवारी झाला. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे अध्यक्षस्थानी होते. या वेळी ‘युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर डॉ. वाघमारे यांचे व्याख्यान झाले. माजी न्यायमूर्ती बी. एन. देशमुख उपस्थित होते. बाबासाहेब हे भारताच्या समाजजीवनात क्रांती घडवून आणणारे युगपुरुष होते. माणगावच्या परिषदेत राजर्षी शाहूमहाराजांनी बाबासाहेबांना दलितांचे उद्धारकर्ते, भावी राष्ट्रीय नेते असे भाकीत केले होते. बाबासाहेबांनी शिक्षण, राजकारण, राज्यघटना, समाजकार्य, चळवळी, धार्मिक परिवर्तन अशा टप्प्यांतून पुढे जात सामाजिक परिवर्तन घडविले. देशातील तत्कालीन जातीय, धार्मिक रूढी-परंपरेच्या जोखडात अडकलेल्या विरोधी लाटेच्या विरोधात संघर्ष करून युगकर्ता बनलेल्या या प्रजासूर्याचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन डॉ. वाघमारे यांनी केले.
माजी न्यायमूर्ती बी. एन. देशमुख यांचे ‘भारतीय राज्यघटना व न्यायव्यवस्था’ या विषयावर व्याख्यान झाले. ते म्हणाले, की डॉ. आंबेडकर यांनी लोकशाही बळकट करणारी राज्यघटना देशाला अर्पण केली. राज्यव्यवस्था कायद्याचे राज्य व्यवस्थित चालवत नसेल, तर त्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार आहे. न्यायालयात न्यायाधीश व न्यायमूर्ती पदांवर सामाजिक स्थितीचे चटके बसणारी मंडळी बसणार नाहीत, तोपर्यंत न्याय मिळणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
विद्यापीठ स्थापनेच्या वेळी औरंगाबादला जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत राहिलेल्या भुजंगराव कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. नामविस्ताराच्या वेळच्या आठवणी तत्कालीन कुलगुरू डॉ. विठ्ठलराव घुगे यांनी जागविल्या. प्रा. संजय मोहड यांनी ‘गीतरामायण’ ही ध्वनिचित्रफीत व डॉ. किशन धाबे यांनी संपादित केलेल्या बाबासाहेबांच्या जीवनातील दुर्मिळ छायाचित्र दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.
मान्यवरांचा सन्मान
डॉ. आंबेडकर शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षांनिमित्त विद्यापीठाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या मान्यवरांचा गौरव या वेळी करण्यात आला. यात भुजंगराव कुलकर्णी (माजी सनदी अधिकारी, माजी कुलगुरू), अॅड. भगवानराव देशपांडे (ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक), शिवराम जाधव (बाबासाहेबांचे सहकारी), पाशाभाई अमीन (बाबासाहेबांच्या गाडीचे चालक), डॉ. विठ्ठलराव घुगे (माजी कुलगुरू), डॉ. यू. म. पठाण (ज्येष्ठ साहित्यिक), ताहेर भाई (बाबासाहेबांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे संग्राहक), प्रवीण भाऊसाहेब मोरे (‘जय भीम’चा नारा देणाऱ्या भाऊसाहेब मोरे यांचे सुपुत्र), डॉ. रमेश नवले (गुलबर्गा विद्यापीठ) यांचा समावेश असून, या सर्वाना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. डॉ. गंगाधर पानतावणे, प्रा. त्र्यंबक महाजन, माजी मंत्री गंगाधर गाडे, डॉ. प्रभाकर मांडे यांचाही गौरव करण्यात येणार आहे.
माजी सनदी अधिकारी भुजंगराव कुलकर्णी, ज्येष्ठ विचारवंत ज. वि. पवार, बीसीयूडीचे संचालक डॉ. के. व्ही. काळे, कुलसचिव डॉ. मुरलीधर लोखंडे, डॉ. सय्यद अझरुद्दीन, संयोजक डॉ. उत्तम अंभोरे आदींची उपस्थिती होती.
‘बाबासाहेबांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारणार’
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मेमोरियल सेंटर व ग्रंथालय सुरू करण्यात येईल, असे कुलगुरू डॉ. चोपडे यांनी सांगितले. मराठवाडय़ाची भूमी ज्ञानभूमी म्हणून ओळखली जाते. या विद्यापीठाला आंतरराष्ट्रीय दर्जाचे विद्यापीठ बनविण्याचे आपले स्वप्न असल्याचेही ते म्हणाले. रोटरी इंटरनॅशनलच्या सहकार्याने पुढील वर्षी १४ एप्रिलला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल इंटरनॅशनल अॅवॉर्ड प्रदान करण्यात येईल, असेही त्यांनी घोषित केले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 15, 2016 1:30 am

Web Title: dr babasaheb ambedkar jayanti celebrate
टॅग : Dr Ambedkar
Next Stories
1 ‘महासत्ता बनविण्यापेक्षा देशात समता प्रस्थापित होणे गरजेचे’
2 जलसंधारण कामांसाठी नांदेडात नाम फाउंडेशनतर्फे दहा जेसीबी
3 भाजप, शिवसंग्राम, काँग्रेस आघाडीत सहा महिन्यांच्या सदस्यत्वासाठी लढत
Just Now!
X