सध्याचे युग हे ज्ञानयुग असून विद्यापीठे सामाजिक परिवर्तनाची केंद्रे बनली आहेत. अशा वेळी नवोन्मेष व दर्जेदार संशोधनाच्या माध्यमातून विद्यापीठाचा लौकिक वाढवावा, अशी अपेक्षा कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी व्यक्त केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नवीन शैक्षणिक वर्षांस सुरुवात झाली. या निमित्त कुलगुरू डॉ. चोपडे यांनी विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी यांच्याशी गुरुवारी संवाद साधला. बीसीयूडी संचालक डॉ. के. व्ही. काळे, वित्त व लेखाधिकारी डॉ. सय्यद अझरुद्दीन, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. सुहास मोराळे उपस्थित होते. डॉ. चोपडे म्हणाले की, विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्षांनिमित्त दरवर्षी संवाद साधण्यात येणार आहे. महाविद्यालयातून विद्यापीठात येणारा विद्यार्थी काही ध्येय, महत्त्वाकांक्षा मनात ठेवून येत असतो.
स्वप्न साकार करण्यासाठी मनात जिद्द व प्रचंड मेहनत घेण्याची आवश्यकता असते. आपल्या विद्यापीठाला ऐतिहासिक वारसा असून, अनेकांनी आपले जीवन येथे येऊन सार्थकी लावले याची जाणीव ठेवून विद्यार्थ्यांनी करीअर घडवावे. विद्यापीठाने गेल्या दोन वर्षांत एनआयआरएफचे मानांकन, सीबीसीएस यासह विविध क्षेत्रांत केलेल्या कामगिरीचा गौरव डॉ. काळे यांनी केला.
विभागप्रमुख डॉ. सुधीर गव्हाणे, डॉ. वाल्मिक सरवदे, डॉ. सतीश बडवे, डॉ. काशिनाथ रणवीर यांनी मार्गदर्शन केले. डॉ. पुरुषोत्तम देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.