30 September 2020

News Flash

स्वतंत्र मराठवाडय़ासाठी बाबासाहेबांच्या भाषणाचा आधार!

‘संयुक्त महाराष्ट्रामुळे गोंधळ निर्माण होण्याचा संभव आहे.

मराठवाडय़ाच्या प्रगतीसाठी स्वतंत्र राज्याच्या मागणीवरून मतमतांतरे व्यक्त होत असतानाच आता या अनुषंगाने काही ऐतिहासिक संदर्भही पुढे केले जात आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालयामध्ये २१ डिसेंबर १९५५ रोजी केलेल्या भाषणादरम्यान राज्याची रचना त्रिगट पद्धतीने करण्याची संकल्पना मांडली होती. या भाषणादरम्यान घटनाकार म्हणाले होते, ‘अखंड संयुक्त महाराष्ट्र ही मागणी अयोग्य असून संयुक्त महाराष्ट्रात मराठवाडय़ासारख्या जिल्ह्य़ातील मागासलेल्या लोकांची प्रगती होऊ शकणार नाही’. त्यांच्या या भाषणाचा संदर्भ ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे’ या पुस्तकातील १८व्या खंडातील भाग तीनमध्ये पान क्रमांक ४६० वर देण्यात आला आहे.

औरंगाबादमधील मिलिंद महाविद्यालयामध्ये झालेल्या भाषणाला आता तब्बल ६२ वर्षे पूर्ण झाली आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तेथील भाषणादरम्यान त्रिगट योजना मांडली होती. ती अशी- ‘पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र व पूर्व महाराष्ट्र अशी रचना करताना मुंबई, औरंगाबाद व नागपूर अशी राजधानीची ठिकाणे राहतील. पूर्व महाराष्ट्र हा राज्य पुनर्रचना मंडळाने सुचविलेला विदर्भाचा भाग राहणार आहे. यात नागपूर, भंडारा, वर्धा, यवतमाळ, अकोला, अमरावती, बुलढाणा, चांदा जिल्ह्य़ांचा समावेश होईल. मध्य महाराष्ट्रात मराठवाडय़ातील पाच जिल्हे (तेव्हा पाच जिल्हेच होते) औरंगाबाद, परभणी, नांदेड, बीड, उस्मानाबाद, नाशिक, डांग, अहमदनगर, पूर्व व पश्चिम खानदेश व सोलापूर जिल्ह्य़ातील कर्नाटकाला जोडलेला मराठी विभाग याचा समावेश होईल. बाकीचा भाग पश्चिम महाराष्ट्रात जाईल. यात ठाणे, कुलाबा, रत्नागिरी, पुणे, उत्तर भाग आणि दक्षिण सातरा, कोल्हापूर, बेळगाव आणि कारवार या जिल्ह्य़ांना अंतर्भूत करण्यात यावे. आर्थिक व सांस्कृतिकदृष्टय़ा हे तीन भाग कार्यक्षम राहतील व या योजनेमुळे त्या त्या भागातील लोकांच्या आकांक्षाही पूर्ण केल्या जातील,’ अशी मांडणी बाबासाहेबांनी केली होती.

हे भाषण ऐकलेले आणि ती मांडणी माहीत असणारे अनेक जण आजही औरंगाबादमध्ये आहेत. आता या विषयावर मात्र कोणी बोलण्यास तयार नाही. ते भाषण आताच्या काळाला लागू पडणार नाही, असे सांगितले जात आहे. जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे यांनी मराठवाडय़ाच्या प्रगतीसाठी स्वतंत्र राज्याचा पर्याय अलीकडेच सुचविला होता. त्यानंतर प्रमुख राजकीय पक्षांनी ही मागणी अयोग्य ठरवत स्वतंत्र मराठवाडा करणे आथिर्कदृष्टय़ा परवडणारे नसल्याचे म्हटले आहे. या पाश्र्वभूमीवर स्वतंत्र राज्याची मागणी असणाऱ्यांकडून हा ऐतिहासिक संदर्भ नव्याने पुढे केला जात आहे.

बाबासाहेब म्हणाले होते..

‘संयुक्त महाराष्ट्रामुळे गोंधळ निर्माण होण्याचा संभव आहे. तेव्हा या मागासलेल्या मराठवाडय़ाची प्रगती व्हावी अशी जर इच्छा असेल, तर त्यांना स्वतंत्र मराठवाडा करून देणे हेच उचित होईल,’ असे बाबासाहेब म्हणाले होते.

बाबासाहेबांनी छोटय़ा राज्यांची संकल्पना मांडली होती. तो विचार गांधींच्या विचारांच्या जवळ जाणारा होता. महात्मा गांधींनी ग्रामस्वराज्याचा मुद्दा मांडला. आताच्या काळातही छोटय़ा राज्यांचा मुद्दा लागू पडतो आहे. बिहार, उत्तर प्रदेशाचे विभाजन करून छोटी-छोटी राज्ये तयार केली. त्यांचा जीडीपी वाढला. तेलंगणा राज्य झाल्यानंतर त्याच्या विकासाचा स्वतंत्रपणे विचार केला जात आहे. संयुक्त महाराष्ट्रात सामील होताना कोणतीही अट न घालता मराठवाडा सामील झाला. तेव्हा मोठा भाऊ छोटय़ा भावाकडे लक्ष देईल, असे वाटले होते. घडले उलटेच. त्यामुळे स्वतंत्र मराठवाडय़ाची मागणी योग्यच ठरते. बाबासाहेबांचे मिलिंद महाविद्यालयातील भाषण त्रिगट संकल्पनेवर होते. तो संदर्भ आजही लागू आहे.    – दिनकर बोरीकर, अध्यक्ष, सरस्वती भुवन शैक्षणिक संस्था

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 21, 2017 1:27 am

Web Title: dr babasaheb ambedkar speech on independent marathwada
Next Stories
1 कुळ जमिनीचा घोळ १०० एकरांचा
2 प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा ‘बाऊन्सर’अन् सचिनचा काढता पाय
3 शिवसेनेकडून पुन्हा एकदा शहराच्या नामांतराचा मुद्दा
Just Now!
X