घशातील स्राव घेणाऱ्या डॉक्टर दहिवळ यांचा अनुभव

सुहास सरदेशमुख, औरंगाबाद</strong>

फारफार तर ३० सेकंदाची ती प्रक्रिया. कानातील मळ काढण्यासाठी जशी कापूस गुंडाळलेली काडी तशीच ती काडी. म्हणजे घशातील नमुन्याची वेगळी आणि नाकातून घशापर्यंतचा स्राव घेण्याची वेगळी काडी. समोरच्या रुग्णाला खोकला येण्याच्या आत त्याची लाळ चिकटली पाहिजे स्व्ॉबला. दिवसभरात सरासरी १०० रुग्णांचे नमुने घेणे हे डॉ. पुष्कर दहिवळ यांचे काम. दंत चिकित्सक असल्याने हे काम त्यांना सरावाने जमते.

‘२६/११ रोजी मुंबईच्या रेल्वे स्थानकाजवळ गेलो होतो. तेव्हा दहशतवादी हल्ला झाला होता. दंत महाविद्यालयात विद्यार्थी होतो तेव्हा. पण त्या वेळी अनुभवलेले भय आणि थरार याचा जो अनुभव होता तोच अनुभव आता जिल्हा रुग्णालयातकरोना चाचणीसाठी लाळेचा नमुना घेताना येतो,’ असे डॉ. पुष्कर दहिवळ सांगत होते. सोबतची परिचारिका तज्ज्ञ असेल तर घशातून आणि नाकातून स्राव घेण्याचा कालावधी कमी होतो. असा स्राव घेताना रुग्णाला खोकला येऊ नये याची काळजी घ्यावी लागते. साधारणत: १२ ते १५ सेंमीची काडी असते. त्यात घशातील लाळेबरोबर विषाणू चिकटून वर येतात. तसेच नाकातील काडी तशी अधिक बारीक असते, पण लांब असते. त्यामुळे शिंक येणार नाही, याची काळजी घ्यावी लागते. दंत रुग्णालयात असणाऱ्या खुर्चीत बसवून ही प्रक्रिया केली जाते. अर्थात ही सगळी प्रक्रिया पीपीई किटशिवाय पूर्णच करता येत नाही. जिल्हा रुग्णालयात दहा दंत चिकित्सक आहेत. प्रत्येकाला तीन दिवस हे काम केल्यानंतर १४ दिवस स्वत:हून अलगीकरण व्हायचे. सध्या डॉ. पुष्करही अलगीकरणात आहेत. तसे ते घरी जात नाहीत. जिल्हा रुग्णालयाने दिलेल्या अलगीकरण कक्षातच ते मुक्कामी आहेत. ते सांगत होते, बहुतांश जण आता घरी जात नाहीत. ज्यांच्यावर सारे घर अवलंबून आहे, ते खूप काळजी घेऊन घरी वावरतात. बहुतेक जण एकटे राहण्याचा प्रयत्न करतात. लाळेचे नमुने घेतल्यानंतर रुग्णालयातच पीपीई कीट काढून नव्याने पोशाख घालतात. पुन्हा घरी गेल्यावर अंघोळ करतात. पण सध्याचा अनुभव आयुष्यभर न विसरता येणारा आहे. भीती आणि थरार दोन्ही बरोबर असते.