महापालिका क्षेत्रातील प्रारूप विकास आराखडा रद्द करावा, या मागणीसाठी नागरी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने करीत महापौरांच्या विरोधात घोषणाबाजी केली. विकास आराखडय़ापासून आझादी मागत ‘आझादी’चे नारे कार्यकर्त्यांनी दिले. डाव्या संघटनांकडून वेगवेगळ्या आंदोलनांत दिल्या जाणाऱ्या घोषणा कृती समिती कार्यकर्त्यांनी दिल्या. विशेष म्हणजे आंदोलनात बहुतांश काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते.
आराखडा तयार करताना मनपा क्षेत्रातील बहुतांश नागरिकांच्या घरावर आरक्षणाच्या माध्यमातून वरवंटा फिरवला जात असल्याचा आरोप कृती समितीचे निमंत्रक राजेंद्र दाते पाटील यांनी केला. स्मशानभूमी व कब्रस्तानामधून रस्ते दाखविण्यात आले आहेत, तर काही ठिकाणी रस्त्याच्या एका बाजूलाच आरक्षण ठेवण्यात आले. त्यामुळे ग्रीन झोनमधील भाग यलो झोनमध्ये आणि यलो झोनमधील भाग ग्रीन झोनमध्ये आला आहे. ४ फेब्रुवारीच्या राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या नकाशावर महापौरांची स्वाक्षरी असून तो कायद्याचा भंग असल्याचे निवेदन कृती समितीने विभागीय आयुक्तांना दिले होते.
मोठय़ा आवाजात ध्वनिक्षेपक लावून केलेल्या घोषणाबाजीमुळे औरंगाबाद विकास आराखडा विरोधी नागरी कृती समितीचे हे आंदोलन लक्षवेधक ठरले. अॅड. सय्यद अक्रम, राजेश मुंडे, मोहम्मद शोएब यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.