बीड जिल्ह्य़ातील तीन गावांत ९० लाखांची वर्गणी धार्मिक कार्यात खर्च

पाणीटंचाईने ग्रासलेल्या महाराष्ट्रातल्या लातूर जिल्ह्य़ात विविध पाणीकामांसाठी लोकांनी स्वयंस्फूर्तीने लाखो रुपये जमा केले.. आपल्या मुलांना अद्ययावत तंत्रज्ञान अवगत झाले पाहिजे, या भावनेने डिजिटल शिक्षणासाठी काही ऊसमजूरांनी स्वत:हून वर्गणी काढून शाळेला आर्थिक पाठबळ दिले.. या घटना ताज्या असतानाच तीव्र दुष्काळ, पाणीटंचाई, नागरी सोयीसुविधांची वानवा ही पाश्र्वभूमी असूनही धार्मिक गडाच्या राजकारणापोटी बीड जिल्ह्य़ातील कोठरबन, बरगवाडी आणि फुंदेटाकळी या तीन गावांतील गावकऱ्यांनी गेल्या महिनाभरात भजन-कीर्तनासाठी ‘नारळी सप्ताह’ आयोजित करून तब्बल ९० लाख रुपयांची वर्गणी गोळा केली. गावात सुविधांची वानवा असताना देवभोळेपणाने उत्सवावर होणाऱ्या या खर्चाकडे काही जागरूक नागरिक लक्ष वेधत असले तरी या धार्मिक उत्सवांना राजकीय नेतेही पाठबळ देत आहेत.

बीड जिल्हय़ात धार्मिक गडांना ‘राजाश्रय’ मिळतो. जिल्हय़ात प्रमुख १५ गड आहेत. यातही तीन गडांचे महत्त्व राजकारणामुळे वाढले आहे. भगवानगड, नारायणगड व गहिनीनाथगड हे जातीच्या अंगाने विभागले आहेत. तीनही गडांच्या महाराजांनी गेल्या महिन्यात सप्ताहाचे आयोजन केले. त्यासाठी माणशी, एकरी आणि उंबरठा अशी वर्गणी ठरवून देण्यात आली होती. या मार्गाने लाखोंची ठेव गोळा झाली.

भगवानगडाचा ८३वा वार्षकि नारळी सप्ताह कोठरबन (तालुका वडवणी) येथे झाला. मानवी विकास निर्देशांकाबरोबरच महिला साक्षरतेत मागास असलेल्या तालुक्यातील वडवणीपासून सात किलोमीटर अंतरावर असलेले तीन हजार लोकसंख्येचे हे खेडे. सप्ताहासाठी गावातून तब्बल ३५ लाखांपेक्षा जास्त वर्गणी यंदा गोळा झाली. या गावास जाण्यासाठी अजूनही डांबरी रस्ता नाही. गावात बस, टपाल कार्यालय नाही. आठवीपर्यंत शाळेच्या वर्गखोल्या मोडकळीस आल्या. दरवर्षी शंभराहून अधिक लोक ऊसतोडणीस जातात. गावात प्यायला पाणी नाही. दररोजची तहान टँकरवर. ४० टक्के लोकांकडे शौचालय नाही, मात्र वर्गणीचा आकडा ३५ लाखांचा. नुकताच श्रीखंडाचा महाप्रसाद झाला. मंदिराच्या बांधकामासही गावकरी २५ लाख रुपये द्यायला तयार आहेत.

अशीच स्थिती बरगवाडीची आहे. एक हजार लोकसंख्येच्या या गावात बहुतांश शेती कोरडवाहू. दरवर्षी शंभराहून अधिक बैलगाडय़ा ऊसतोडणीस जातात. गेल्या १० वर्षांत एकही तरुण नोकरीला लागला नाही. खडकाळ परिसर असल्यामुळे शौचालये बांधली जात नाहीत. असे बकाल चित्र असणाऱ्या गावात नारायणगडाच्या नारळी सप्ताहासाठी ४६ लाख रुपये जमले. गावातील प्रत्येकाने किमान ११ हजारांची वर्गणी दिली. सर्व गावांप्रमाणे येथेही टँकरच आहे. गावातल्या विहिरीतून महिला, मुले पाणी शेंदतात. असे चित्र असले, तरी या वर्षी दुष्काळात महाप्रसादावर ३० लाख रुपयांचा खर्च गावकऱ्यांनी केला.

अशीच कहाणी गहिनीनाथगडाची. पाथर्डी तालुक्यात फुंदेटाकळी येथे नारळी सप्ताह झाला. या गावाची अवस्था बरगवाडी आणि कोठरबनसारखीच. सप्ताहास वर्गणी म्हणून जमलेली रक्कम २५ लाख रुपये. या गडावरून जिल्हय़ातील दोन्ही नेत्यांनी जोरदार भाषणे केली, आरोप-प्रत्यारोप केले. नारळी सप्ताहात हजेरी लावून, ‘मी तुमचाच’, हे सांगण्यासाठी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे धडपडताना दिसत होते.

नारळी सप्ताह म्हणजे काय?

हरिनाम सप्ताहासाठी दरवर्षी गाव निवडले जाते. ते निवडताना शेवटच्या दिवशी पुढील वर्षी कोणत्या गावात सप्ताह होणार, हे ठरवताना गावच्या प्रमुखाकडे नारळ दिला जातो. विशेष म्हणजे हा सप्ताह आपल्या गावात व्हावा, म्हणून गावकरीच उत्सुक असतात. भगवानगडाच्या पुढच्या १० वर्षांतील सप्ताहाचे नारळ गावकऱ्यांना आधीच देण्यात आले आहेत.

बंधाऱ्यांच्या मागणीकडे पंकजा मुंडे यांचे दुर्लक्ष

बरगवाडीतील लोकांनी तर जलसंधारणमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे गावाची जलनियुक्त शिवार योजनेमध्ये निवड करून बंधारे बांधावेत, अशी मागणी केली. मात्र, बंधाऱ्याच्या मागणीकडे त्यांनी दुर्लक्ष केले आणि नारायगणगडाच्या विकासासाठी ५१ लाख रुपये देण्याची घोषणा केली. ऊसतोड मजुरांच्या जिल्हय़ात उत्सवांवरील लाखो रुपयांचा खर्च भुवया उंचवणारा आहे.

गावागावांत दुष्काळ हटविण्यासाठी बाहेरून आलेल्या स्वयंसेवी संस्था पाण्यासाठी वर्गणी गोळा करत आहेत. विविध प्रकारची कामे त्यांच्या हातून घडत आहेत. मात्र, स्थानिक पातळीवर देवभोळेपणाने उत्सवावर होणारा लाखोंचा खर्च आश्चर्यकारक आहे.

– अ‍ॅड. अजित देशमुख, माहिती अधिकार कार्यकर्ते