24 August 2019

News Flash

मराठवाडा : दुष्काळ पुन्हा उंबरठय़ावर

मराठवाडय़ातील परळी, हिमायतनगर, वसमत, सेलू या तालुक्यात केवळ २९.०७ टक्के पाऊस पडला आहे.

औरंगाबाद : येत्या आठ-दहा दिवसांत पाऊस नाही पडला तर पिकांचे मरण ठरल्यासारखे आहे. गेल्या वर्षीदेखील अगदी असेच घडले होते. आता जमिनीतली ओल संपली आहे. मुळे तग धरू शकणार नाहीत, असे बालानगरचे माजी सरपंच अमोल गोर्डे सांगत होते. पैठण तालुक्यातील बालानगर, अडुळ परिसरातील शेतकरी हैराण आहेत. कारण त्यांच्याकडे फक्त एकच मोठा पाऊस झाला. ही स्थिती संपूर्ण मराठवाडय़ातील आहे. जुलैच्या मध्यापर्यंत ४९ टक्के पाऊस पडणे अपेक्षित होते. त्यापैकी वार्षिक सरासरीच्या केवळ १६.०५ टक्के पाऊस पडला आहे. आता पिके माना टाकू लागली आहेत. दुष्काळाचे एक मोठे संकट पुन्हा मराठवाडय़ावर घोंघावते आहे. गेल्या दहा वर्षांत मराठवाडय़ात चार हजार ५६५ आत्महत्या झाल्या आहेत. अशीच स्थिती राहिली तर सलग दुसऱ्या वर्षीचा हा दुष्काळ मरणकळा घेऊन येईल, अशी भीती व्यक्त होत आहे.

मराठवाडय़ातील परळी, हिमायतनगर, वसमत, सेलू या तालुक्यात केवळ २९.०७ टक्के पाऊस पडला आहे. ५० टक्क्य़ांपेक्षा कमी पाऊस झालेल्या तालुक्यांची संख्या वाढतेच आहे. औरंगाबाद जिल्ह्य़ातील फुलंब्री, सिल्लोड या तालुक्यांत काहीसा बरा पाऊस झाला. त्यामुळे या तालुक्यांत परंपरागत मक्याची लागवड करण्यात आली. पण त्यावर लष्करी अळीचा प्रदुर्भाव झाल्याने हे सगळे पीक हातचे जाणार आहे. बहुतांश ठिकाणी पेरणी वाया जाण्याची शक्यता आहे. ज्यांच्याकडे फळबागा होत्या, विहिरीत पाणी होते असे शेतकरीही आता हैराण झाले आहेत. अमोल गोर्डे सांगत होते, त्यांच्याकडे ५०० मोसंबीची झाडे होती. त्यातील ३०० झाडे वाळली, ती त्यांनी तोडली. आता २०० झाडांना पुन्हा टँकरने पाणी घालण्याची वेळ आली आहे. कापूस, तूर, बाजरीची पेरणी केली होती. आता आठ दिवसांचाच कालावधी शिल्लक आहे. तेवढय़ात पाऊस नाही आला तर होत्याचे नव्हते होईल.

औरंगाबाद कृषी विभागाचे अधीक्षक डॉ. तुकाराम मोटे सांगत होते, पेरणी झालेल्या क्षेत्रात जे काही उगवले आहे, ते किती दिवस टिकून राहील, हे सांगता येणे अवघड आहे. आठ-दहा दिवसांत पाऊस नाही आला तर पीक हातचे जाऊ शकते. विशेषत: ज्या भागांत पहिला एक मोठा पाऊस येऊन गेला आहे, तेथील पेरणी धोक्यात आहे.

मराठवाडय़ात गेल्या दहा वर्षांत फक्त दोन वर्षे सरासरी आणि त्यापेक्षा अधिक पाऊस झाला होता. दरवर्षी कमी पावसामुळे शेतकरी हैराण आहेत. हवालदिल या शब्दाची तीव्रता दिवसागणिक वाढते आहे. परिणामी कृषीसंबंधी आत्महत्यांचे प्रमाण नियंत्रणात ठेवणे हे प्रशासकीय यंत्रणेबरोबरच गावांतील जाणत्या लोकांसमोरही आव्हान बनले आहे.

First Published on July 19, 2019 1:25 am

Web Title: drought conditions continue in marathwada zws 70