गेल्या २० दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे खरीप पिके वाचतील की नाही, या चिंतेत शेतकरी आहेत. जलयुक्त शिवारच्या कामांमुळे परिस्थिती काहीशी नीट असली, तरी आणखी थोडी पावसाने ओढ दिली तर पुन्हा दुष्काळ सावट येईल, असे चित्र आहे. दरम्यान, हवामान विभागाने सरासरीपेक्षा अधिक पाऊस होईल, असा दिलेला अंदाज आज मागे घेत पाऊस सरासरी एवढाच होईल, असे म्हटले आहे. मराठवाडय़ातील जायकवाडी आणि विष्णुपुरी ही दोन धरणे वगळता अन्यत्र सर्व धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा झालेला नाही. अजूनही चार धरणांची पाणीपातळी शून्यावर आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे संकट कायम आहे.

मोठय़ा आशेने या वर्षी पीक विम्यातून मिळालेली रक्कम शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामासाठी लावली. ऊस अधिक पाणी घेतो म्हणून शासनाने ठरविलेल्या धोरणानुसार कडधान्य आणि सोयाबीनच्या पेऱ्यात वाढ झाली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने पिके करपू लागली आहेत. लातूर जिल्ह्य़ात काही ठिकाणी पुन्हा एकदा पावसाच्या सरी येऊन गेल्या. त्यामुळे पिकांना जीवदान मिळाले. अन्यत्र पिकांची स्थिती वाईट आहे.

पिण्याच्या पाण्याची स्थिती दिवसेंदिवस आणखी गंभीर होईल, असे चित्र दिसून येत आहे. जायकवाडी धरणात चांगला पाणीसाठा झाल्याने गोदावरीच्या पात्राच्या भोवताली असणाऱ्या सर्व शहरांना आणि गावांना पिण्याच्या पाण्याची सोय होऊ शकेल. मात्र, लातूर, उस्मानाबाद आणि बीड या कृष्णा खोऱ्याअंतर्गत येणाऱ्या शहरांना आणि गावांना पिण्याच्या पाण्याची अडचण जाणवू शकते. धरणातील पाण्याची स्थिती अत्यंत वाईट आहे. येलदरीमध्ये ९.२८ टक्के पाणीसाठा आहे. तर सिद्धेश्वरमध्ये १९.०३ टक्के पाणीसाठा आहे.

माजलगाव, मांजरा, निम्नतेरणा, सीनाकोळेगाव या धरणांची पाणीपातळी अजूनही शून्यावरच आहे. शहागड बंधाऱ्यात ४.४४ टक्के, तर मानारमध्ये १०.९७ टक्के एवढे पाणी आहे. नांदेड शहराच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे. विष्णुपुरी धरणात ८५.५८ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा एकदा पावसाळी वातावरण निर्माण झाले असून अजूनही मोठा पाऊस झालेला नाही. त्यामुळे पुन्हा दुष्काळ सावट दिसू लागले आहे. जायकवाडी जलाशयात येणाऱ्या पाण्याची आवक थांबलेली आहे. धरणातील पाणी निम्न भागासाठी सोडायचे की नाही, याचा धोरणात्मक निर्णय जलसंपदामंत्र्यांनी घेतलेला नाही.