|| सुहास सरदेशमुख

कामाच्या शोधात अनेकजण पुण्याकडे

रान करपून गेले. कापूस आला नाही. नगदी रक्कम हाती उरली नाही. कर्जमाफी झाली पण दीड लाखापेक्षा अधिकची रक्कम भरण्यासाठी हाती पैसे नव्हते. सावकारांनी वेळेवर मदत केलेली. त्याची रक्कम परत कशी द्यायची अशी विवंचना सोबतीला. त्यामुळे बीड व हिंगोली जिल्हय़ातून शहराकडे स्थलांतर होऊ लागले आहे. दुष्काळाचे चटके एवढे भीषण आहेत की शहरात शिक्षणासाठी वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना खाणावळीचे पैसे भरण्यासाठी आता काम करावे लागत आहे.

बीड जिल्हय़ातील वडवणी तालुक्यातील रामराव शिंदे शनिवारी पुण्याला निघाले होते कामाच्या शोधात. पाच एकर शेतीमध्ये पिक पिकले नाही. पाऊस नसल्याने कापसाने दगा दिला. नाही तर गाव सोडायची वेळ आली नसती, असे ते सांगत होते.

देहू येथे त्यांचा एक मित्र कंपनीमध्ये नोकरी करतो. त्याला काम पहायला त्यांनी सांगितले आहे. रामराव शिंदे खरीप हंगामात शेतात राबले. त्यांचा मुलगा अंकुश औरंगाबाद शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात राज्यशास्त्र विभागात शिकतो. तो पहिल्या वर्षांत पहिला आलेला. ‘कमवा- शिका’ योजनेतून त्याला कसेबसे दोन हजार रुपये मिळतात. पण त्याला वडिलांची काळजी आहे.

तो सांगत होता, ‘शेतीमध्ये प्रत्येक बाबीला पैसे लागतात. बँकेचे कर्ज माफ झाले, पण वरचे पैसे भरण्याची स्थिती नाही. बहिणीच्या लग्नासाठी अर्धा एकर जमीन विकली होती. उरलेल्या रकमेतून शेतात घर बांधले. तेव्हा आणखी कर्ज काढावे लागले. अडचण सतत जाणवत राहते. त्यातून सावकाराचे तीन लाख रुपये देणे झाले. आता ती रक्कम फेडायची असेल तर कोठे तरी काम करण्याशिवाय पर्याय नाही. आता मी सुद्धा वडिलांबरोबर पुणे येथे काम मिळते का हे पाहण्यासाठी जात आहे.’ पूर्वी अर्धा एकर जमीन विकली होती. आता विकली तर हाती काही राहणार नाही. लोकांचे पैसे तर द्यावे लागतील. त्यामुळे आता गाव सोडल्याशिवाय पर्याय नाही. काम मिळेल का, याचा शोध घेत त्याचे वडील पुण्याला निघाले आहेत. रामराव हे स्थलांतरीत होणाऱ्या अनेकांपैकी एक.

बीड जिल्हय़ातील शेतकरी पुण्याकडे स्थलांतरीत होत आहेत. तर हिंगोली, परभणी जिल्हय़ातील लोक औरंगाबादकडे कामाच्या शोधात येत आहेत. हिंगोलीमधील ऐश्वर्या भगवान ठोके हिच्या वडिलांकडे नऊ एकर शेती. ती विद्यापीठामध्ये वनस्पतिशास्त्र विभागात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. तिच्या शिक्षणासाठी लागणारा पैसा ती कमवा- शिका योजनेतून मिळवते. पूर्वी घरी पैसे मागितले की मिळायचे. पण आता वडील मुदत मागून घेतात.कुठे तरी उसना व्यवहार करतात. तिचा एक भाऊ शेतीमध्ये होता. पण घर भागेना म्हणून अलीकडेच तो औरंगाबादजवळ चित्तेपिंपळगावमध्ये कंपनीत नोकरी करण्यासाठी आला. सुदैवाने त्याला काम मिळाले. पण गावागावांतून आता स्थलांतरणास सुरुवात झाली आहे. कारण दुष्काळाने घेरले आहे. जगण्याची भ्रांत निर्माण झाली आहे. शहरात आता काम मिळेल का, याची चाचपणी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या नातेवाईकांकडे सुरू झाली आहे. अनेकजण गाव सोडताहेत. रान करपून गेले आहे. अर्थकारण आक्रसते आहे.