मराठवाडय़ातील जायकवाडी धरण ९१.६८ टक्के भरले असले, तरी अन्य धरणातील पाणीसाठा अजूनही उणे चिन्हातच आहे. निम्नदुधना, येलदरी, सिद्धेश्वर, माजलगाव, मांजरा, निम्नतेरणा, सीनाकोळेगाव या धरणांमध्ये शून्यापेक्षा कमी पाणीसाठा आहे. परिणामी मराठवाडय़ात अनेक गावांना अजूनही टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे.

१२९८ टँकरने होणारा पाणीपुरवठा आणखी किती दिवस करावा लागेल याचे गणित कोणालाही सांगता येत नाही. मात्र, २०१५ मध्ये उन्हाळ्यात सुरू झालेले टँकर तब्बल २१ महिने सुरू ठेवावे लागले होते. तीच स्थिती सध्या आहे. फेब्रुवारीपासून सुरू असणारा टँकरचा पाणीपुरवठा अजूनही कमी झालेला नाही. लातूर शहराला आता महिन्यातून केवळ दोनदा पाणीपुरवठा होणार आहे. अशीच स्थिती परभणी आणि उस्मानाबाद या शहरांची आहे.

पाऊस नसल्यामुळे हैराण झालेल्या शेतकऱ्यांनी कृत्रिम पावसाचा प्रयोग केव्हा होतो, अशी विचारणा करायला सुरुवात केली आहे. नुकतेच समाजमाध्यमावर पावसाचे ढग आले असल्यास विभागीय आयुक्त कार्यालयात कळवा, असे कोणीतरी पसरवले आणि दिवसभर अधिकाऱ्यांना उत्तरे देता देता  नाकीनऊ आले. कृत्रिम पावसाचे विमान प्रयोगासाठी अद्याप उड्डाण करू शकलेले नाही.

राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस असला, तरी मराठवाडय़ातील अनेक महसूल मंडळात पुरेसा पाऊस नसल्याने जनावरांच्या छावण्या सुरू आहेत.

रिमझिम पावसामुळे आटलेल्या विंधनविहिरींना केवळ आठ-दहा दिवस पाणी आले आणि त्यानंतर पुन्हा विंधनविहिरी कोरडय़ा पडू लागल्या आहेत. त्यामुळे शहरातील पाण्याचे प्रश्न गंभीर बनले आहेत.

* अपेक्षित पावसाच्या सरासरीच्या ३२ टक्के पाऊस मराठवाडय़ात झाला आहे. काही तालुक्यांमध्ये २० टक्केही पाऊस झालेला नाही.

* बीड जिल्ह्य़ात शिरूरकासार, वडवणी आणि गेवराई या तालुक्यात १७ ते २० टक्क्य़ांच्या दरम्यान पाऊस झाला आहे.

* जायकवाडी धरण भरल्याने परभणीपर्यंतचे सिंचनाचे क्षेत्र टिकून राहील. अन्यत्र दुष्काळाने गाठले असल्याचे चित्र दिसून येत आहे.

*  मांजरा पाणलोटाच्या क्षेत्रातील तालुक्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची स्थिती गंभीर आहे. यात अंबाजोगाई, कळंब, लातूर शहराचा भाग येतो.