सिल्लोड तालुक्यातील उंडणगावात सर्पदंशाने नुकताच योगेश पाटील नावाच्या सहा वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्याला प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले खरे; पण तेथे ‘अ‍ॅण्टी स्नेक वेनॉम सेरम-१०’ यासारखे इंजेक्शन उपलब्ध झाले नाही. नातेवाईकांना योगेशला सिल्लोडला घेऊन जाण्याचा सल्ला मिळाला. तेथे नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला. उंडणगावात सर्पदंशावरील औषध उपलब्ध झाले नव्हते. नजीकच्या सिव्हना गावातही माहिती घेऊन पाठवता आले असते. तेथे १३ इंजेक्शन होती. त्यातले एक कामी आले असते आणि कदाचित योगेश.. उंडणगावाजवळील पानवड येथे ५, कामठाणात २, पालोद येथील आरोग्य केंद्रात ५ तर अंधारीत १० इंजेक्शन उपलब्ध होते. पण थेट तालुका किंवा जिल्हा पातळीवरील घाटीतच नेण्याचा सल्ला दिला गेला. आपल्या गावात कोणती औषधे आहेत, याची माहिती खरे तर स्थानिक संस्थेकडे असायला हवी. पण यंत्रणा असे थोडेच वागते?वेळेत योग्य सल्ला मिळाला नाही तर माणूस गमावला जातो याचे आणखी एक उदाहरण आठवडय़ापूर्वी घनसावंगी तालुक्यात घडले. तेथीलही एक चिमुकला सर्पदंशानंतर मृत्यू पावला. जवळच्या घनसावंगी आरोग्य केंद्रात त्याला नेले असते तर वाचू शकला असता. तेथे ६० इंजेक्शन उपलब्ध आहेत. पण त्याची माहिती ग्रामीण भागातील सर्पदंश झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना मिळत नाही. सध्या ग्रामीण भागात सर्दी-पडसे असा आजार असेल तरच तिथे औषधे दिली जातात. सर्पदंशासारखा प्रकार असेल तर थेट पुढील उपचारासाठी शहरांकडे पाठवले जाते. पावसाळा सुरू आहे. जमिनीतून सरपटणारे प्राणी बाहेर येण्याचा हा काळ. खबरदारी म्हणून सर्पदंशावरील औषध प्राथमिक आरोग्य केंद्रात आहेत की नाही, हे तपासण्याचाही काळ. पण त्यासाठी कोणी भांडायचे, असा प्रश्न आहे.

प्रशासकीय यंत्रणा मात्र कायम औषधांचा तुटवडा नाही, असा दावा करीत असते. औरंगाबाद जिल्ह्य़ातील ५० प्राथमिक आरोग्य केंद्रात ३३९ इंजेक्शन उपलब्ध आहेत. जालना जिल्हा चिकित्सकांच्या अधिकारातील रुग्णालयांमध्ये २५२५ इंजेक्शन आहेत. त्यातील २ हजार इंजेक्शन जिल्हा रुग्णालयातच आहेत. औरंगाबादच्या घाटी रुग्णालयातही कायम डॉक्टरांकडून औषधे बाहेरून आणण्यासाठीची चिठ्ठी नातेवाईकांकडे सोपवली जाते. गौतम आठवले हे येथील एका कंपनीत काम करतात.

आळंदनजीक त्यांचे गाव. खासगी दवाखाने परवडत नाहीत म्हणून आठवले यांनी वहिनींना घाटीत दाखल केले तर तिथे एक इंजेक्शन बाहेरून आणा, असे सांगितले गेले. दुकानदाराने औषधाची किमत सांगितली एकवीसशे रुपये. आठवलेंना धक्काच बसला. शिनगारे हेही पत्नीला घेऊन दाखल झाले. त्यांनाही काही व्हिटॅमिनची औषधे आणण्यासाठी बाहेर पाठवले. घाटी परिसरात रुग्णांची नातेवाईक नजीकच्या मेडिकला शोधत फिरताना कायम दिसतात. अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर या मात्र औषधांचा तुटवडा असल्याचे मानत नाहीत. त्यांच्या मते आवश्यक ती औषधे उपलब्ध आहेत. शासकीय कॅन्सर रुग्णालयातूनही बाहेरगावाहून आलेल्या रुग्णांना काही औषधे हे बाहेरूनच आणण्यास सांगितले जाते. मराठवाडय़ाचे शेवटचे टोक असलेल्या बिलोली तालुक्यातील तळणी येथून रामनारायण गुंतापल्ले हे नेहमी पत्नीला उपचारासाठी औरंगाबादेतील कॅन्सर रुग्णालयात आलेले. साधारण ४०० किमी अंतरावरून. एखादे औषध नसल्याचे सांगितले जाते. ते केव्हा येईल विचारले तर चार-पाच दिवस लागतील, असे ऐकून घ्यावे लागते. यंत्रणा बाहेरील मेडिकलमधून औषध आणण्याचा पर्याय देतात. येथे थांबले तर दररोज २०० रुपयांप्रमाणे खर्च करावा लागतो. जायचे आणि पुन्हा यायचे. त्यात आपल्यापेक्षा रुग्णाचे अधिक हाल. त्यापेक्षा करा खरेदी औषधांची, असा विचार करतो, असे गुंतापल्ले सांगतात. सेनगाव तालुक्यातील जयपूर येथील दत्ता डोईफोडे हे स्वत: रुग्ण आहेत. त्यांनाही अनेक वेळा इंजेक्शन बाहेरून आणायला सांगितले जाते.

औषधखर्च आवाक्याबाहेर

शासकीय कॅन्सर रुग्णालयात तर अनेकवेळा केमोचे इंजेक्शनही बाहेरून मागवले जाते. सतराशे रुपयांपर्यंत मिळणारे हे इंजेक्शन आजाराच्या भीतीने खरेदी केले जाते. केमोसारख्या औषधांचाही येथे तुटवडा भासतो. गॅ्रनीसेट, रेन्टेजीन, सायक्लो फॉस्पोमाइट, केमो कार्प, प्लॅटलीटॅक्सीन, अशी काही औषधे रुग्णांना बाहेरून आणण्यास सांगितले जाते. औरंगाबादेत बिलोलीसारख्या ४०० किमी अंतरावरील गावातून कॅन्सर रुग्णांना दाखल केले जाते. सर्व दैनंदिन खर्च भागवून पुन्हा औषधांवर खर्चही रुग्णांच्या नातेवाईकांना करावा लागतो.