करोनामुळे राज्यातील फूलशेतीला घरघर लागली आहे. गेले काही दिवस बाजारपेठ बंद असल्याने दररोजची फूलविक्री थांबली. मंदिरे बंद झाल्यानंतर हा व्यवसाय अडचणीत येईल, ही शक्यता गृहीत धरण्यात आली होती. मात्र, फुलांची बाजारपेठ आता पुन्हा केव्हा सुरू होईल, हे सांगता येत नसल्याने  नव्याने फूलशेतीला पाणी देणे थांबविले आहे.

वैजापूर तालुक्यातील झोलेगाव येथील शेतकरी कैलास जाधव सांगत होते, थोडीशी अधिक  रक्कम मिळावी म्हणून फूलशेतीमध्ये उतरलो होतो. मात्र करोना आला आणि टाळेबंदी जाहीर झाली. त्यामुळे प्रत्येकाची गरज जीवनावश्यक सामान घेण्याकडे असणार, हे कळले होते. आता फूलखरेदी कोण करणार? आता फूलशेतीला पाणी देणे बंद केले आहे. काही दिवसाने सारे काही सुकेल. काही आठवडय़ांपूर्वी निशीगंध आणि झेंडूची फुले औरंगाबादच्या बाजारपेठेमध्ये देत होतो. आता ही शेती काही दिवस पूर्णत: थांबवावी लागेल.

औरंगाबादसह राज्यातील सर्व फूल उत्पादक शेतकरी आता अडचणीत आले आहेत. खर्च वजा जाता अर्धा एकर शेतीमध्ये १५ हजार रुपयांपर्यंत नफा होत असे. हा व्यवसाय तसा नाजूक असे. कारण फूल तोडणीनंतर तो माल शहरांमध्ये वेळेत पोहचला नाही तरी नुकसान होत असे. आता तर फूल कोणी घेणारच नाही. त्यामुळे फूलशेती काढून टाकण्याशिवाय पर्याय राहणार नाही. मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर या शहरांमध्ये बिजली, निशीगंध, झेंडू, जाई, शेवंती आदी फुले मोठय़ा प्रमाणात येतीत. मात्र आता हे ठप्प आहे.