बिपीन देशपांडे

अनेक विद्यार्थ्यांचा गावीच मुक्काम; शैक्षणिक क्षेत्राला फटका

मराठवाडय़ाकडे पाठ फिरवलेल्या पावसाचे परिणाम वेगवेगळ्या क्षेत्रात आता दिसू लागले आहेत. शिक्षण क्षेत्राला तर याचा सर्वाधिक फटका बसत आहे. दुष्काळसदृश परिस्थितीमुळे स्पर्धा परीक्षेसाठी शहरात राहण्याचा खर्च पालकांना पेलवणार नाही म्हणून अनेक विद्यार्थ्यांनी गावीच मुक्काम लांबवला आहे. परिणामी शहरातील अभ्यासिका ओस पडू लागल्या आहेत.

गतवर्षी स्पर्धा परीक्षेसाठी औरंगाबादेत आलेला प्रमोद बांगर यंदा मात्र गावीच थांबलाय. बीड जिल्ह्यच्या पाटोदा तालुक्यातील भायाळा हे त्याचे लहानसे गाव. या गावची बहुतांश शेती कोरडवाहू. प्रमोद सांगत होता, ‘‘गतवर्षीची आणि सध्याच्या पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे वर्षभर शहरातील जेवणा-राहण्याचा खर्च वडिलांना पेलवणारा नाही. शेतात अजूनही पेरणी नाही. मुबलक पाऊस झाला नाही तर पुढे आई-वडिलांसारखे मलाही ऊसतोडीला जावे लागेल.’’ त्याच गावचा पण सध्या औरंगाबादेतील अभ्यासिकेत तीन वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा दिलीप बांगर म्हणाला, ‘‘दुष्काळसदृश परिस्थितीमुळे वडील किती दिवस पसे पाठवतील हे सांगता येणार नाही. जोपर्यंत त्यांच्याकडे पसे आहेत तोपर्यंत पाठवतील. त्यांना ज्या दिवशी शक्य होणार नाही त्या दिवशी कदाचित मलाही गावाकडे परतावे लागेल. आम्हाला पाच एकर शेती, तीही कोरडवाहू. पेरल ते अणि उगवल त्यावरच गुजराण चालते. गतवर्षी फारसे काही हाती आले नाही. यंदाही पावसाचे आशादायक चित्र अजून तरी निर्माण झाले नाही. कसे होईल, या विचाराने अस्वस्थ होतो. दुष्काळामुळे विद्यार्थ्यांची अभ्यासिकेतील संख्या यंदा कमी झाली आहे. गतवर्षी आपल्या अभ्यासिकेत तीन वर्ग भरायचे. यंदा मात्र अजून तरी एकच भरला जातोय.’’  दिलीपसारखीच अवस्था औरंगाबाद जिल्ह्यतील करमाडजवळील मुरुमखेडा गावच्या भगवान दाभाडेचीही आहे. भगवान सांगत होता, ‘‘जेमतेम चार एकर शेती. लहान भावाला छायाचित्रणाचा अभ्यासक्रम शिकवायचा आहे. पण त्यावरही विचार करतो आहोत. बहुदा ते यंदा तरी शक्य होणार नाही. कारण आपल्यासाठी वर्षभरात ७० ते ८० हजार रुपये वडिलांना बाजूला काढून ठेवावे लागतात. गतवर्षी वडिलांनी पसे पाठवले. यंदा मात्र थोडे अवघड वाटत आहे.’’

औरंगाबादेतील ७० टक्के अभ्यासिकांमध्ये अजूनही अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नाही. मुलींच्या बाबतीत अधिक चिंता वाटते. कारण मुलांसाठी पालक पशांची व्यवस्था करतात. पण मुलींच्या शिक्षणासाठी पसा लावण्याची पालकांची तयारी नाही. अपेक्षित विद्यार्थ्यांची संख्या नसल्यामुळे अभ्यासिका सुरू झालेल्या नाहीत. त्याचा परिणाम शिक्षण क्षेत्रावर अवलंबून मेस, शैक्षणिक व्यवसायावरही दिसतो आहे.

– प्रशांत कदम, अभ्यासिका संचालक.